बिद्रीच्या डिस्टलरी प्रकल्पाची राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अचानक चौकशी!
बिद्री ता. कागल येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याने नवीन डिस्टलरी प्रकल्प सुरु केला आहे. या प्रकल्पाच्या तपासणीसाठी पुणे येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाने रात्री अचानक धाड टाकली. रात्री दहापासून पहाटे चार पर्यंत प्रकल्पाची माहिती घेण्यात आली.
या कारखान्याच्या डिस्टलरी प्रकल्प उभारणीला विविध कारणांनी विलंब झाला आहे. त्यातच शासनाच्या विविध मंजुरी घेण्यासाठी अनेक महिने गेले. त्यामुळे प्रकल्प सुरु होण्यासाठी विलंब झाला. यामागे राजकारण केला असल्याचा आरोप सत्ताधारी मंडळींनी केला. तर विरोधी मंडळींनी मंजुरी नसताना प्रकल्प उभारणीची घाई का केली असा प्रत्यारोप केला. बिद्रीच्या निवडणुकीत डिस्टलरीचा मुद्दा फार गाजला. मात्र निवडणुकीत सत्ताधारी के. पी. पाटील यांच्या आघाडीलाच सभासदांनी स्विकारले.
निवडणूक निकालानंतर डिस्टलरी मंजुरीसाठी कारखान्याने गती घेतली. त्यामध्ये स्पिरिट निर्मितीला मंजुरी घेऊन प्रकल्पातून स्पिरीट उत्पादन घेण्यास सुरुवात केली. त्यातून सुमारे २० लाख लिटर स्पिरीट तयार करण्यात आले. मात्र ईथेलान निर्मिती मंजुरी अद्यापही मिळालेली नाही. स्पिरिट निर्मिती होवून अनेक महिने उलटल्यानंतर अचानक काल शुक्रवारी रात्री राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अचानक तपासणी करण्यात आली. या प्रकल्पात कांही दोष आहेत की नाही याची तपासणी पथकाकडून संपर्काअभावी माहिती मिळू शकली नाही.