बिधुरींच्या टिप्पणीमुळे आतिशींना अश्रू अनावर
पत्रकार परिषद घेत भाजपवर प्रतिहल्ला
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांनी सर्व मर्यादा ओलांडल्याचे दिसत आहे. कालकाजी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणारे भाजप नेते रमेश बिधुरी यांनी सर्वप्रथम काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्यावर अशोभनीय टिप्पणी केली. त्यानंतर मुख्यमंत्री आतिशी यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यासंबंधी सोमवारी बिधुरी यांना पत्रकार परिषदेत उत्तर देताना दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांना अश्रू अनावर झाले. आपल्या 80 वर्षीय वडिलांना बिधुरी यांनी शिवीगाळ केल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत रडत-रडत सांगितले. तसेच निवडणुकीसाठी असे घाणेरडे राजकारण करणार का? अशी विचारणा करत देशाचे राजकारण इतकी खालची पातळी गाठेल, असे मला वाटले नव्हते असेही त्यांनी सांगितले.
आतिशी यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी करताना ‘त्यांनी वडील बदलले आहेत’ असे वक्तव्य रमेश बिधुरी यांनी केले होते. सोमवारी भाजप नेते रमेश बिधुरी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी रडल्या. माझे वडील आयुष्यभर शिक्षक राहिले आहेत. त्यांनी हजारो गरीब मुलांना शिकवले आहे. आता ते 80 वर्षांचे असून त्यांची प्रकृती इतकी गंभीर आहे की त्यांना आधाराशिवाय चालताही येत नाही. रमेश बिधुरी आता अशा टप्प्यावर पोहोचले आहेत की, ते एका वृद्धाला शिवीगाळ करून मते मागत आहेत, असे आतिशी अश्रू ढाळत पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री आतिशी यांच्या पत्रकार परिषदेचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करत ‘आतिशीजी, तुम्ही दिल्लीतील सर्व महिलांसाठी प्रेरणास्थान आहात. तुम्हाला शिवीगाळ करून भाजपने तुमचाच नाही तर दिल्लीतील प्रत्येक महिलेचा अपमान केला आहे. दिल्लीतील प्रत्येक महिला भाजपच्या या अपमानाचे उत्तर देईल.’ असे म्हटले आहे. यापूर्वी प्रियांका गांधी यांच्यावर केलेल्या अशोभनीय वक्तव्याला महिलाविरोधी ठरवत काँग्रेसने भाजपवर जोरदार हल्ला चढवला होता. त्यानंतर रमेश बिधुरी यांनी सोशल मीडियावर माफी मागितली होती.