बिडेन यांच्या पुत्राची सुरक्षा हटविली
डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक निर्णय
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी माजी अध्यक्ष जो बिडेन यांचे पुत्र हंटर आणि एश्ले यांच्यासाठीची सिक्रेट सर्व्हिस प्रोटेक्शन रद्द केली आहे. हंटर यांना दीर्घकाळापर्यंत सिक्रेट सर्व्हिस प्रोटेक्शन मिळाली होती, याचा पूर्ण खर्च अमेरिकेच्या करदात्यांकडून केला जात होता असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
याचबरोबर एश्ले बिडेन यांच्या सुरक्षेत तैनात 13 एजंट्सना अन्य कामासाठी तैनात केले जाणार आहे. एका पत्रकाराकडून हंटर बिडेन यांना पुरविण्यात येणाऱ्या सुरक्षेबद्दल ट्रम्प यांना प्रश्न विचारला होता. यानंतर काही तासातच ट्रम्प यांनी बिडेन यांच्या पुत्राची सुरक्षा काढून घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
अलिकडेच व्हाइट हाउसमध्ये दाखल होण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका युवकाला सिक्रेट सर्व्हिस एजंट्सनी ठार केले होते. या घटनेवेळी अध्यक्ष ट्रम्प हे फ्लोरिडा येथे होते. तत्पूर्वी सिक्रेट सर्व्हिसला स्थानिक पोलिसांकडून एक कथित आत्मघाती व्यक्तीविषयी माहिती मिळाली होती. हा व्यक्ती इंडियानातून प्रवास करत होता. एजंटांना त्या क्यक्तीची कार आणि तपशीलाशी मिळताजुळता असणारा इसम व्हाइट हाउसनजीक दिसून आला होता. अधिकारी त्याच्या जवळ पोहोचताच त्याने बंदुक बाहेर काढली होती. यानंतर झालेल्या कारवाईत संबंधित इसम मारला गेला होता.