For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बिडेन यांचा पराभव निश्चित!

07:00 AM Jul 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
बिडेन यांचा पराभव निश्चित
Advertisement

बराक ओबामांचा दावा : राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचे मैदान सोडण्याचेही आवाहन

Advertisement

वृत्तसंस्था /वॉशिंग्टन

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी अध्यक्ष जो बिडेन यांचा विजय अवघड असल्याचा दावा केला आहे. ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने यासंबंधीचे वृत्त प्रसारित केले असून त्यात बिडेन यांनी आता अध्यक्षपदाची उमेदवारी सोडावी अशी इच्छा ओबामा यांनी व्यक्त केल्याचे नमूद करण्यात आले आहे. वाढत्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर बिडेन यांनी ऐनवेळी माघार घेतल्यास उपाध्यक्ष कमला देवी हॅरिस (59) या ट्रम्प यांच्याविरोधात लढण्याच्या शर्यतीत आघाडीवर असतील.

Advertisement

28 जून रोजी अध्यक्षीय चर्चेत डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून बिडेन यांचा पराभव झाला होता. आगामी अध्यक्ष निवडण्यासाठी पक्षासाठी बिडेन यांच्या उमेदवारीचा निर्णय महत्त्वाचा असल्याचे ओबामा यांनी आपल्या संभाषणात म्हटले आहे. ट्रम्प यांच्या विरोधातील डिबेटमधील पराभवानंतर बिडेन यांची अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घ्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. आता या यादीत सर्वात ओबामा यांचे नावदेखील जोडले गेले आहे. हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या स्पीकर असलेल्या नॅन्सी पेलोसी यांनीही बिडेन यांनी आता अध्यक्षीय निवडणुकीच्या मैदानातून माघार घ्यावी, असे म्हटले होते.

देशात करण्यात आलेल्या काही खासगी पातळीवरील सर्वेक्षणानुसार, 65 टक्के मतदारांनीही बिडेन यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवला आहे. केवळ 35 टकके डेमोक्रॅट्सना बिडेन यांनी निवडणूक लढवावी अशी इच्छा आहे. 67 टक्के गोऱ्या मतदारांना बिडेन यांनी उमेदवारी मागे घ्यावी असे वाटते. अमेरिकेच्या एकूण 33 कोटी लोकसंख्येपैकी 60 टक्के गोरे मतदार आहेत.

हायव्होल्टेज ड्रामामध्ये बदललेली अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक बिडेन यांच्या राजकीय कारकिर्दीचे अखेरचे काऊंटडाऊन ठरत आहे. जो बिडेन यांची खराब प्रकृती, डेमोव्रॅटिक पक्षावरील त्यांची स्वत:ची पकड आणि माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची वाढती भीती अशा संभाव्य धोक्यांमुळे बिडेन आता अध्यक्षीय निवडणुकीच्या मैदानातून माघार घेतील असे दिसते. पक्षाचे नेते आणि मित्रपक्षांच्या वाढत्या दबावामुळे बिडेन या आठवड्याच्या अखेरीस आपली उमेदवारी मागे घेऊ शकतात. डेमोक्रॅटिक पक्षाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांच्या हवाल्याने अमेरिकन न्यूज वेबसाईट एक्सिओसने ही माहिती दिली आहे.

Advertisement
Tags :

.