स्मार्ट सिटी योजनेतील सायकली-वाहने धूळखात
बेळगाव : स्मार्ट सिटीमध्ये सायकल चालविण्यासाठी ट्रॅक तयार करण्यात आले. याचबरोबर स्मार्ट सिटीअंतर्गत भाड्याने देण्यासाठी सायकली व इलेक्ट्रिक दुचाकी उपलब्ध करण्यात आल्या. मात्र त्या अनेक ठिकाणी धूळखात पडल्या आहेत. त्यामुळे सरकारची ही योजना पूर्णपणे अपयशी ठरली आहे. चन्नम्मा चौकामध्ये वाहने तशीच पडून आहेत. याचबरोबर सायकलीही तशाच कचऱ्यामध्ये ठेवण्यात आल्या आहेत. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सायकल व इलेक्ट्रिक वाहनांचा वापर व्हावा, यासाठी प्रयत्न करण्यात आले. शहरातील विविध ठिकाणी ही वाहने भाड्याने देण्यासाठी सेंटर उघडण्यात आली. त्या ठिकाणाहून इतर ठिकाणी जाणे व परिसरातील सेंटरमध्ये वाहन व सायकल जमा करणे, असे पर्याय देण्यात आले होते. मात्र बेळगावच्या जनतेने त्याकडे पाठ फिरविली. परिणामी आता ही योजना चालविणाऱ्या ठेकेदारानेही त्याकडे दुर्लक्ष केले आहे. सायकली, वाहने धूळखात पडली आहेत.