Konkan Heavy Rain: पाण्याच्या लोंढ्यात सायकलस्वार तरुण गेला वाहून, दापोलीतील घटना
जिल्ह्यात पावसामुळे 31 लाखाची हानी, इंटरनेट सेवा ठप्प
दापोली : सायकलवरून पूल पार करत असताना अचानकपणे आलेल्या पाण्याच्या लोंढ्यात वणंद येथील राजेंद्र कोळंबे (वणंद, 45) हा तरुण वाहून गेला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी राजेंद्र कोळंबे हा आपल्या ड्युटीवरुन सायकलने घरी परतत होता.
यावेळी कोंडीचा पूल पार करण्याचा प्रयत्न करत असतानाच वेगाने आलेल्या पाण्याच्या लोंढ्यामुळे तो सायकलसह वाहून गेला. पोलीस प्रशासन व महसूल विभाग ग्रामस्थांच्या मदतीने उशिरापर्यंत त्याचे शोधकार्य सुरू होते. धुवांधार पावसामुळे दापोलीतील जनजीवन विस्कळीत झाले. इंटरनेट सेवासुद्धा ठप्प आहे.
रस्त्यावर चिखल आल्याने दापोली-खेडमार्गावरील वाहतूक पालगडमार्गे वळवण्यात आली. चुकीच्या नियोजनामुळे दापोली-खेड राज्य महामार्गाच्या सुरू असणाऱ्या कामाचा फटका येथील नागरिकांना बसत आहे. सोमवारी या रस्त्यावर पुलाचे काम सुरू असणाऱ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चिखल आल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला.
येथील वाहतूक पालगड मार्गे वळवण्यात आली आहे. 29 कि.मी.च्या राज्यमार्गाचे काही महिन्यांपूर्वी काम सुरू करण्यात आले. खेड तालुक्यातील दोन पुलांची कामे अद्याप शिल्लक असल्याने पुलाच्या बाजूने वाहनांकरिता पर्यायी रस्ता बनवण्यात आला होता. मात्र सुरू झालेल्या पावसाने या पर्यायी रस्त्यांची पूर्ण वाताहात झाली आहे.
शिवाय पावसामुळे नदीदेखील प्रवाहित झाली आहे. यामुळे दापोली-खेड मार्गावरील वाहतूक दस्तुरीवरून पालगडमार्गे दापोलीला वळवली आहे. तर दापोलीतून खेडकडे जाणारी वाहतूक शिरशिंगे फाटा येथून पालगड मार्गे दस्तुरीला वळवण्यात आलेली आहे.
गोठा कोसळून एक वासरू ठार
वणोशी तर्फ नातू देऊळवाडी येथील शंकर चव्हाण यांच्या मालकीचा गोठा पावसामुळे कोसळून एक वासरू दगावल्याची घटना घडली आहे. यामध्ये 5 जनावरांना वाचवण्यात यश आले. यामध्ये चव्हाण यांनी वर्षभरासाठी जमवून ठेवलेल्या वैरणाचेदेखील मोठे नुकसान झाले आहे. महसूल विभागातर्फे नुकसानीचा पंचनामा करण्याचे काम सुरू होते.
इंटरनेटअभावी दापोली ठप्प
धुवांधार पावसामुळे दापोलीत सोमवारी दिवसभर वीजेचा लपंडाव सुरू झाला. यामुळे इंटरनेटसेवादेखील ठप्प झाली. सकाळी बंद झालेली सेवा सायंकाळपर्यंत सुरळीत झालेली नसल्याने संपर्क तुटला होता. बँका व इतर ऑनलाइन सुविधा देणाऱ्या आस्थापनांमध्ये नागरिकांना मन:स्ताप सहन करावा लागला.