For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

डेन्मार्कमध्ये धर्मग्रंथ जाळण्यावर बंदी

06:17 AM Dec 09, 2023 IST | Tarun Bharat Portal
डेन्मार्कमध्ये धर्मग्रंथ जाळण्यावर बंदी
Advertisement

देशाच्या सुरक्षेसाठी धोका निर्माण करणारे कृत्य

Advertisement

वृत्तसंस्था/ कोपनहेगन

डेन्मार्कमध्ये सार्वजनिक ठिकाणी धर्मग्रंथ जाळण्यावर बंदी घालण्यात आली आहे. मुस्लीम देशांसोबतचा तणाव कमी करण्यासाठी डेन्मार्कच्या संसदेने हा निर्णय घेतला आहे. धर्मग्रंथ जाळण्याच्या घटनेच्या विरोधात जुलैपासून आतापर्यंत 500 हून अधिक निदर्शने झाली आहेत. तसेच अशाप्रकारच्या कृत्यांमुळे डेन्मार्कचे अन्य देशांसोबतचे संबंध, राष्ट्रीय हित तसेच सुरक्षेला धोका निर्माण झाल्याचे वक्तव्य न्याय मंत्री पीटर हमलगार्ड यांनी केले आहे.

Advertisement

संसदेत 5 तासांच्या चर्चेनंतर 179 पैकी 94 खासदारांनी यासंबंधीच्या प्रस्तावाच्या बाजूने तर 77 खासदारांनी विरोधात मतदान केले आहे. नव्या कायद्यात कुठल्याही धर्मग्रंथाला फाडणे, जाळणे किंवा सार्वजनिक स्वरुपात त्याचा अपमान करण्यावर बंदी घालण्यात आली असल्याचे सरकारने म्हटले आहे. या निर्णयासाठी इतिहासात आमची निंदा होणार असल्याचे म्हणत डेन्मार्क डेमोक्रेट्स पार्टीचे नेते इंगर स्टोजबर्ग यांनी या कायद्याला विरोध दर्शविला आहे.

अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंदी आम्ही निश्चित केली आहे का बाहेरील शक्तींनी आमच्याकडून असे करविले आहे हा खरा प्रश्न असल्याचे स्टोजबर्ग यांनी म्हटले आहे. या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्याला 2 वर्षांची शिक्षा आणि दंड ठोठावला जाणार आहे. स्वीडनमध्ये देखील धर्मग्रंथ जाळण्यावर बंदी घालण्यासंबंधी चर्चा सुरू आहे.

स्वीडनमध्ये सध्या बंदी घालण्याऐवजी पोलिसांच्या कारवाईला अधिक कठोर करण्यावर जोर देण्यात येत आहे. जून महिन्यात डेन्मार्कचा शेजारी देश स्वीडनमध्ये ईद-अल-अजहावेळी एका मशिदीबाहेर एका इसमाने धर्मग्रंथ जाळण्याचे कृत्य केले होते. यानंतर त्याने स्वीडनचा झेंडाही फडकविला होता. या घटनेनंतर जुलै महिन्यात डेन्मार्कमध्ये देखील विशिष्ट समुदायाच्या विरोधात निदर्शने करण्यात आली होती.

डेन्मार्कमधील घडामोडींच्या प्रतिक्रियेदाखल इराकची राजधानी बगदादमधील डेन्मार्कच्या दूतावासावर हल्ला करण्याचा प्रयत्न तेथील निदर्शकांनी केला होता. हे पाहता डेन्मार्कने स्वत:च्या देशातील सुरक्षा वाढविण्याचा निर्णय घेतला होता. तर धर्मग्रंथ जाळण्याच्या घटनांसंबंधी सौदी अरेबिया, युएई, तुर्किये, पाकिस्तान समवेत अनेक इस्लामिक देशांनी संताप व्यक्त केला होता.

Advertisement
Tags :

.