For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बिबवणे येथे चालत्या डंपरला आग; डंपर जळून खाक, चालक सुखरूप; मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक विस्कळीत

11:46 AM Oct 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
बिबवणे येथे चालत्या डंपरला आग  डंपर जळून खाक  चालक सुखरूप  मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक विस्कळीत
Advertisement
कुडाळ / वार्ताहर : मुंबई-गोवा महामार्गावर बिबवणे येथे तेर्सेबांबर्डे हद्दीनजीक रविवारी सायंकाळी सुमारे 6.15 वाजण्याच्या सुमारास चालत्या डंपरला अचानक आग लागली. या आगीत डंपर पूर्णपणे जळून खाक झाला. मात्र, चालकाने वेळीच सतर्कता दाखवून डंपर थांबविल्याने सुदैवाने जीवितहानी टळली. वासुदेव तळवणेकर (रा. मळेवाड) असे डंपरचालकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर डंपर सावंतवाडीहून कुडाळच्या दिशेने जात होता. बिबवणे येथे तेर्सेबांबर्डे हद्दीनजीक असताना डंपरच्या जॉइंटचा भाग तुटून डिझेल टाकीवर आदळला. त्यामुळे टाकी फुटली. त्यानंतर तुटलेला जॉइंट रस्त्यावर घासल्याने ठिणग्या उडाल्या आणि डंपरने पेट घेतला, असे चालकाने सांगितले.

Advertisement

डंपरला आग लागल्याचे लक्षात येताच चालक तळवणेकर यांनी प्रसंगावधान राखून वाहनावर नियंत्रण मिळवले आणि ते थांबविले. त्यानंतर ते सुरक्षितपणे डंपरमधून बाहेर पडले. मात्र, डिझेल टाकी फुटल्यामुळे काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. त्यामुळे डंपर पूर्णपणे जळून खाक झाला.

अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात

चालत्या डंपरला आग लागल्याचे समजताच महामार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांसह बिबवणे आणि तेर्सेबांबर्डे येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, डिझेल टाकी फुटल्याने आग तीव्र झाली होती. त्यामुळे जवळचे पाणी आणून आग विझविणे शक्य झाले नाही. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाने पाण्याचा मारा करून आग पूर्णपणे आटोक्यात आणली.

Advertisement

महामार्गावरील वाहतूक ठप्प

डंपर रस्त्याच्या मधोमध थांबल्याने महामार्गावरील एका बाजूची वाहतूक बंद झाली. परिणामी, सुमारे एक तासाहून अधिक काळ वाहतूक विस्कळीत झाली. या घटनेची माहिती मिळताच कुडाळ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जयदीप पाटील आणि सहकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू केली.

सदर डंपर मडुरा-बांदा परिसरातील असल्याची चर्चा घटनास्थळी होती. डंपरला आग लागल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले असून, चालक सुरक्षित असल्याने मोठा अनर्थ टळला.

Advertisement
Tags :

.