बिबवणेत भरदिवसा बंद घर फोडले; १३ लाखांचा ऐवज लंपास;पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू
कुडाळ/वार्ताहर : कुडाळ तालुक्यातील बिबवणे-नाईकवाडी येथे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत बंद घराचा कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा घरफोडी केल्याची घटना सोमवारी सायंकाळी उशिरा उघडकीस आली. चोरट्यांनी घरातील लोखंडी कपाटाचा लॉकर उचकटून सुमारे 8तोळे वजनाचे अंदाजे 12 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने तसेच 1 लाख 9 हजार 500 रुपये रोख, असा एकूण सुमारे13 लाख 9हजार 5000 रुपयांचा ऐवज लंपास केला.
या धाडसी चोरीमुळे बिबवणे परिसरात खळबळ उडाली असून, चोरट्यांनी घराची आधीपासूनच टेहळणी करून ही चोरी केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
घर बंद असल्याची साधली संधी
प्रथम चोरट्यांनी एका बेडरूममधील लोखंडी कपाट उघडून आतील साहित्य अस्ताव्यस्त केले. मात्र, तेथे मौल्यवान वस्तू न मिळाल्याने त्यांनी शेजारील दुसऱ्या बेडरूमकडे मोर्चा वळवला. तेथील लोखंडी कपाट उघडून लॉकर हत्याराने उचकटण्यात आला. लॉकरमधील सोन्याचे दागिने आणि कपाटातील १ लाख ९ हजार ५०० रुपयांची रोकड घेऊन चोरटे पसार झाले.
शेजाऱ्याला चोरीचा लागला सुगावा
सायंकाळी उशिरापर्यंत चव्हाण यांच्या घरातील दिवे लागले नसल्याने शेजारी राहणारे त्यांचे काका रमाकांत चव्हाण घराकडे गेले. त्यावेळी घराच्या मुख्य दरवाजाला कुलूप नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. दरवाजा उघडून आत गेल्यानंतर दोन्ही बेडरूमचे दरवाजे उघडे असून कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचे दिसून आले. त्यांनी तातडीने शरद व सरोज चव्हाण यांना याची माहिती दिली. चव्हाण दाम्पत्य घरी आल्यानंतर सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले.
श्वानपथक, ठसे तज्ज्ञ घटनास्थळी
घटनेची माहिती मिळताच कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास बडवे यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. उपविभागीय पोलीस अधिकारी राजेश भागवत यांनीही सोमवारी रात्री घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मंगळवारी सकाळी सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पथकही घटनास्थळी दाखल झाले.
चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वानपथकाला पाचारण करण्यात आले असून, ठसे तज्ज्ञांनी घटनास्थळावरून महत्त्वाचे ठसे घेतले आहेत. या प्रकरणी सरोज शरद चव्हाण यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांकडून अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू आहे.
मुंबई-गोवा महामार्गालगत असलेले बंद घर भरदिवसा फोडण्याचे धाडस करण्यात आल्याने चोरट्यांना परिसराची माहिती असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यांनी आधी घराची टेहळणी केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.