प्रश्नपत्रिकाफुटीसंबंधी पक्षपाती धोरण
झारखंड आणि पंजाबमधील प्रकारांकडे डोळेझाक
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नीट-युजी प्रश्नपत्रिकाफुटीप्रकरणी कॉक्रोच जनता पार्टीने आंदोलन केले असले, तरी आता या संघटनेवर पक्षपाताचा आरोप केला जात आहे. पंजाब आणि झारखंड या राज्यामध्येही प्रश्नप्रत्रिकाफुटीची अनेक प्रकरणे गेल्या दोन वर्षांमध्ये समोर आली आहेत. तथापि, कॉक्रोच जनता पार्टी या प्रकारांसंबंधी मूग गिळून गप्प का आहे, असा प्रश्न विचारला जात आहे. अद्याप, या संघटनेने या आरोपावर समर्पक स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यामुळे या संघटनेची भूमिका पक्षपाती असल्याचे अनेक तज्ञांचे मत असून संघटनेच्या भूमिकेसंबंधी प्रश्न पडत आहेत.
प्रश्नपत्रिकाफुटीसंबंधी आंदोलन करताना ही संघटना पक्षपात करते का, असा मुद्दा उपस्थित होण्यामागे मोठी पार्श्वभूमी आहे. केंद्र सरकारविरोधात या संघटनेने आंदोलन केले. केंद्रीय शिक्षणमंत्र्यांना पदत्याग करावा लागला. तथापि, हीच संघटना झारखंड आणि पंजाब या राज्यांच्या शिक्षणमंत्र्यांकडून पदत्यागाची मागणी करीत नाही. याचा अर्थ ही संघटना ‘निवडक’ पद्धतीने कार्यरत आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षाच्या राज्यसभा सदस्य स्वाती मालीवाल यांनी केला. केंद्र सरकारविरोधात थयथयाट करणारी ही संघटना विरोधी पक्षांच्या राज्यांमध्ये घडलेल्या अशाच प्रकारांसंबंधी तोंडात मिठाची गुळणी धरत आहे. यावरुन या संघटनेच्या भूमिकेत सातत्य नाही, हे स्पष्ट दिसून येते, असा मालीवाल यांचा आरोप आहे.
अनेक राज्यांमध्ये प्रश्नपत्रिकाफुटी
विरोधी पक्षांची सरकारे असणाऱ्या सर्वच राज्यांमध्ये अनेकदा प्रश्नपत्रिकाफुटीचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडले आहेत. आम आदमी पक्षाचे सरकार असलेल्या पंजाबमध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये प्रश्नपत्रिका फुटीचे महत्वाचे प्रकार 6 वेळा घडले. पंजाबमध्ये सामुहिक कॉपी मोठ्या प्रमाणात होत आहे. पंजाब सरकारने प्रश्नपत्रिकाफुटीचे आरोप फेटाळले आहेत. तथापि, पुरावे असूनही या प्रकरणांची चौकशी टाळली जात असल्याचे दिसून येते. येथे संघटनेची भूमिका संशयास्पद ठरत आहे, असे अनेक टीकाकारांचे मत आहे. झारखंड राज्यात, जिथे प्रश्नपत्रिका फुटीसह परीक्षेत गैरप्रकार होण्याची अनेक प्रकरणे घडली आहेत. झारखंड येथे सीआयडीकडून प्रश्नपत्रिकाफुटीसंबंधी आठ संशयितांना अटक करण्यात आली आहे. हे पाऊल केंद्र सरकारनेही नीट युजी प्रकारणी उचलले असून अनेक जणांना अटक केली आहे. त्यांच्यावर जलदगती न्यायालयात प्रकरणे चालणार आहेत. तथापि, ही संघटना केवळ केंद्र सरकारविरोधात आंदोलन करीत असून झारखंडमधील प्रकारांवर तिने तोंडावर बोट ठेवले असल्याचा आरोप होत आहे.
संघटना आंदोलन करणार नाही ?
केंद्र सरकारच्या विरोधात हिरीरीने मैदानात उतरलेली ही संघटना झारखंड आणि पंजाबमध्ये तेथील सत्ताधारी राजकीय पक्षांच्या विरोधात आंदोलन करणारच नाही का ? हा मुद्दा निर्माण झाला आहे. तसेच असा पक्षपात केल्यास संघटनेच्या हेतुविषयी शंका उपस्थित होते. त्यामुळे संघटनेसंबंधी विश्वासाचा प्रश्नही निर्माण होण्याची शक्यता आहे, असे मत अनेक टीकाकारांनी व्यक्त केले. या सर्व आरोपांना आणि संघटनेच्या हेतुविषयी शंका उपस्थित करणाऱ्या मुद्द्यांना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अद्याप समर्पक उत्तर दिलेले नाही. अनेक पत्रकारांनी संघटनेचे प्रवक्ते आशुतोष रांका आणि सौरव दास यांना या पक्षपाती भूमिकेविषयी प्रश्न विचारले आहेत. तथापि, कोणतेही समाधानकारक उत्तर मिळालेले दिसत नाही. संघटनेने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी अनेकांनी केलेली आहे.