For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय रेल्वेच्या नकाशात येणार भूतान

06:45 AM Aug 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारतीय रेल्वेच्या नकाशात येणार भूतान
Advertisement

चीनचे टेन्शन वाढविणार भारताचे पाऊल : रेल्वे अन् संरक्षण मंत्रालयाकडून प्रकल्पाला वेग

Advertisement

भूतान अत्यंत लवकरच भारतीय रेल्वेच्या नकाशावर झळकणार आहे. भूतानला जोडण्यासाठी 69 किलोमीटर लांब आंतरराष्ट्रीय रेल्वेमार्गावर केंद्र सरकार 3500 कोटी रुपये खर्च करत आहे. सरकारने कोक्राझार-गेलेफू रेल्वेमार्गाला विशेष रेल्वेप्रकल्पाचा दर्जा दिला आहे.

  वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

ईशान्येतील राज्य सिक्कीम आणि शेजारी देश भूतान लवकरच भारतीय रेल्वेच्या अधिकृत नकाशावर स्वत:ची उपस्थिती नोंदविणार आहेत. चीन आणि भूतान सीमेवर रणनीतिक पोहोच आणि संपर्कव्यवस्था मजबूत करण्यासाठी रेल्वे आणि संरक्षण मंत्रालयाने या प्रकल्पांवरील कामाला वेग दिला आहे.

सरकारने सिक्कीमसाठी 2027 आणि भूतानसाठी 2029 पर्यंत रेल्वेसेवा सुरू करण्याचे लक्ष्य बाळगले आहे. भारताचे हे पाऊल चीनसाठी टेन्शन वाढविणारे ठरू शकते. चिकन नेकवर नजर ठेवणाऱ्या चीनसाठी हा मोठा झटका ठरणार आहे. चिकन नेक भागात कोंडी करून भारताला ईशान्येत अडचणीत आणण्याचे धाडस चीन करू शकणार नाही.

भूतानसाठी 69 किमीचा रेल्वेमार्ग

भारत-भूतानला जोडण्यासाठी 69 किलोमीटर लांब आंतरराष्ट्रीय रेल्वेमार्गावर केंद्र सरकार 3500 कोटी रुपये खर्च करत आहे.  कोक्राझार-गेलेफू रेल्वेमार्गाला सरकारने अधिकृत स्वरुपात विशेष रेल्वे प्रकल्पाचा दर्जा दिला आहे. हा निर्णय प्रशासकीय अडचणी दूर करत भूमी अधिग्रहण आणि वन मंजुरीच्या प्रक्रियेला गीत देण्यासाठी घेण्यात आला आहे. हा रेल्वेसंपर्क दोन्ही देशांदरम्यान द्विपक्षीय संबंध आणि व्यापाराला नवी मजबुती देण्यासह भूतानच्या गेलेफू माइंडफुलनेस सिटी मास्टरप्लॅनला थेट स्वरुपात भारतीय रेल्वे नेटवर्कशी जोडणार आहे.

सीमा सुरक्षा मजबूत होणार

या दोन्ही प्रकल्पांमुळे ईशान्येतील दुर्गम क्षेत्रांमध्ये सामान्य लोक, पर्यटक आणि व्यापाऱ्यांची ये-जा सुगम अन् स्वस्त होईल. तसेच सीमेवर भारताचे सामरिक आणि भौगोलिक शक्तिसंतुलनही पूर्णपणे बदलणार आहे. सीमा सुरक्षा आणि सैन्य रसदमध्ये रणनीतिक मजबूती येणार आहे. चीन आणि भूतानच्या सीमांवर स्थित या अत्यंत संवेदनशील मोर्चावर वर्तमानात खराब हवामान किंवा भूस्खलनामुळे सैन्याशी संबंधित वाहतूक प्रभावित होते. नवा रेल्वेमार्ग सुरू झाल्यावर तेथे सैन्यसामग्री, शस्त्रास्त्रs आणि तुकड्या पोहोचविण्यास लागणारा कालावधी 50 टक्क्यांपेक्षा अधिक घटेल. नदीच्या खाली निर्माण होणारे भूमिगत स्थानक आणि भुयारांमधून जाणारा हा मार्ग सर्व ऋतूंमध्ये सुरक्षित संपर्कव्यवस्था प्रदान करेल.

भूमिगत रेल्वेस्थानक

सिक्कीमला ब्रॉडगेज रेल्वेसेवेशी जोडण्यासाठी सेवक-रंगपो रेल्वे प्रकल्पावर काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. 44.96 किलोमीटर लांब या आव्हानात्मक रेल्वेमार्गाचा जवळपास 86-90 टक्के हिस्सा भुयारांमधून जाणारा आहे.  सर्वात मुख्य आकर्षण तीस्ता नदीखाली तयार होणारे तीस्ता बाजार रेल्वेस्थानक आहे. हे देशातील पहिले पूर्णपणे भूमिगत रेल्वेस्थानक असेल. 14,450 कोटीच्या निधीतून तयार होणाऱ्या या मार्गावर रेल्वे संचालन 2027 पर्यंत सुरु करण्याचे लक्ष्य आहे.

Advertisement
Tags :

.