भूषण बोरसे बेळगावचे नूतन पोलीस आयुक्त
यडा मार्टिन मार्बन्यांग यांची बदली : अल्पावधीतच उचलबांगडीची वेळ का आली?
बेळगाव : पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांची बदली झाली आहे. त्यामुळे रिक्त झालेल्या पदावर भूषण गुलाबराव बोरसे यांची वर्णी लागली आहे. गुरुवारी सायंकाळी सरकारने राज्यातील पाच आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून या यादीत बेळगाव पोलीस आयुक्तांचाही समावेश आहे. यडा मार्टिन मार्बन्यांग यांच्यासह मंगळूरचे पोलीस आयुक्त अनुपम अगरवाल यांची बदली करण्यात आली असून त्यामुळे रिक्त झालेल्या पदावर सुधीरकुमार रेड्डी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंगळूर व बेळगाव येथील काही दिवसांपासून सुरू असलेल्या घटना राज्य सरकारने गांभीर्याने घेतल्या असून या पार्श्वभूमीवर गुरुवारी बदल्यांचा आदेश जारी करण्यात आला आहे.
18 मार्च 2024 रोजी पोलीस आयुक्त पदावर रुजू झालेल्या यडा मार्टिन मार्बन्यांग यांना किमान दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच त्यांची बदली करण्यात आली आहे. बेळगाव येथे पोलीस दलात बदल करण्यासाठी त्यांनी सातत्याने बदल केले. मात्र कनिष्ठ अधिकाऱ्यांची त्यांना साथ मिळाली नाही. उलट काही अधिकाऱ्यांनी त्यांची दिशाभूल करण्यात धन्यता मानली. त्याचा फटका पोलीस आयुक्तांना बसला. संतिबस्तवाड येथे मुस्लीम धर्मग्रंथ जाळण्याच्या प्रकरणानंतर उद्भवलेली परिस्थिती त्यांनी चांगल्या पद्धतीने हाताळली होती. या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष पथकांचीही नियुक्ती करण्यात आली होती. प्रकरणाचा छडा लागण्याआधीच त्यांची बदली करण्यात आली आहे. त्याआधीचे पोलीस आयुक्त एस. एन. सिद्दरामप्पा हे 29 फेब्रुवारी 2024 रोजी निवृत्त झाले होते. त्यामुळे रिक्त झालेल्या पदावर 15 मार्च रोजी यडा मार्टिन मार्बन्यांग यांची नियुक्ती करण्यात आली होती.
सुरुवातीपासून चुकीच्या अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन त्यांना मिळत गेले. काही अधिकाऱ्यांनी स्वत:च्या स्वार्थापोटी नेहमीच त्यांची दिशाभूल केली. बेळगावात नेमके काय सुरू आहे? अधिकारी आपली दिशाभूल करीत आहेत? यामध्ये चांगले कोण? दिशाभूल करणारे कोण? याची जाणीव झाल्यामुळे गेल्या एक-दोन महिन्यांपासून यडा मार्टिन मार्बन्यांग यांनी दिशाभूल करणाऱ्यांना दूर ठेवले होते. मात्र परिस्थितीची जाणीव होण्याआधीच त्यांची बदली झाली आहे. नूतन पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे हे 2009 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. सध्या सायबर क्राईम व नार्कोटिक्स विभागात ते सेवा बजावत होते. त्यांची बेळगाव पोलीस आयुक्तपदी वर्णी लागली आहे. आता तरी पोलीस आयुक्तांचे चेंबर कान भरणाऱ्या कंपूपासून मुक्त होणार की ही परंपरा अशीच चालू राहणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.