भूपेंद्र हुड्डावर चढूनींनी साधला निशाणा
विरोधी पक्षनेत्याची भूमिका बजावण्यास असमर्थन
वृत्तसंस्था/ चंदीगड
माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा यांना हरियाणातील विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी काँग्रेसने देऊ नये. कारण हुड्डा हे मागील 10 वर्षांपासून ही भूमिका योग्यप्रकारे पार पाडू शकलेले नाहीत असा दावा भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष आणि संयुक्त संघर्ष पक्षाचे प्रमुख गुरनाम सिंह चढूनी यांनी केला आहे.
काँग्रेस पक्षाने या निवडणुकीत हुड्डा यांच्यावर पूर्ण जबाबदारी सोपविली होती. परंतु राज्यात काँग्रेसच्या बाजूने वातावरण निर्माण होऊ शकलेले नाही. काँग्रेसच्या बाजूने शेतकऱ्यांनीच वातावरण निर्माण केले होते. तरीही हु•ा यांनी शेतकऱ्यांना कुठलेच महत्त्व दिले नाही. काँग्रेसकडून कुठल्याही शेतकऱ्याला उमेदवारी देण्यात आली नाही असे चढूनी यांनी म्हटले आहे.
भाजप हा पूर्वीपासूनच शेतकऱ्यांच्या विरोधात आहे, अशा स्थितीत शेतकऱ्यांनी जावे तर कुठे? आम्ही निवडणुकीत उतरलो मग हर्ष छिक्कार आणि रमेश दलाल देखील निवडणुकीत उतरले. हुड्डा यांनी कुणासोबत तडजोड होऊ दिली नाही आणि त्यांच्या मनमानीचे परिणाम सर्वांसमोर आहेत. आता काँग्रेसने राज्यात लढू शकेल असा नेत्याची निवड विरोधी पक्षनेता म्हणून करावी असे चढूनी यांनी म्हटले आहे.
पराभवासाठी हुड्डाच जबाबदार
हुड्डा यांनी केवळ काँग्रेस आणि आप नव्हे तर शेतकऱ्यांनाही पिछाडीवर आणून सोडले आहे. शेतकरी एका जागेची मागणी करत होते, परंतु हुड्डा यांनी स्पष्ट नकार दिला. आम आदमी पक्षासोबत आघाडी न होण्यास हुड्डा हेच कारणीभूत आहेत. काँग्रेसचे उमेदवार निवडताना हुड्डा यांनी मनमानी केली. तर पक्षात नाराज असलेल्या नेत्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्नही हुड्डा यांनी केला नसल्याचा दावा चढूनी यांनी केला आहे.