Kolhapur Crime | भुदरगड घरफोडीचा 24 तासांत छडा; एलसीबीकडून निपाणीचा चोरटा जेरबंद
भुदरगडमध्ये घरफोडीचा २४ तासांत छडा
पाटगाव -भुदरगड तालुक्यातील अनफ बुद्रुक येथील घरफोडी प्रकरणाचा अवघ्या २४ तासांत छडा लावत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आरोपीस अटक केली आहे. या कारवाईत सोन्याचे व चांदीचे दागिने, रोख रक्कम व इतर साहित्य असा एकूण ४० हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
२३ एप्रिल रोजी फरजाना फयाज शेख (रा. अनफ बुद्रुक, ता. भुदरगड) यांच्या राहत्या घराचे कुलूप उचकटून चोरट्याने घरात प्रवेश करून सोन्याचे दागिने, इतर धातूचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली होती. याबाबत भुदरगड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी हा गुन्हा लवकरात लवकर उघड करण्याची सूचना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांना दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसउपनिरीक्षक जालिंदर जाधव यांनी पथकासह तत्काळ घटनास्थळी भेट देऊन तपासाला सुरुवात केली.
तपासादरम्यान, साक्षीदारांकडून माहिती घेऊन तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणीकरण्यात आली. यावेळी पोलीस अंमलदार राजू कोरे यांना गोपनीय माहितीदारामार्फत गुन्ह्यातील आरोपी कागल-मुरगूड मार्गावरील पाटबंधारे कार्यालयाजवळ येणार असल्याची माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाणयांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या पथकाने २६ एप्रिल रोजी सापळा रचून आरोपी बाबू राजू शेख (रा. ताशिलदार प्लॉट, निपाणी, ता. निपाणी, जि. बेळगाव) यास ताब्यात घेतले. पोलिसांच्या या धाडसी कारवाईबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
आरोपी भुदरगड पोलिसांच्या ताब्यात
पोलिसांनी चोरट्याकडून सोन्याच्या दोन बाळ्या, चांदीच्या दोन बांगड्या, सोनेरी रंगाचे (इमिटेशन) ब्रेसलेट, रोख रक्कम, मोबाईल हँडसेट, एक घड्याळ तसेच गुन्ह्यात वापरलेले ब्लेड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त मुद्देमालासह आरोपीस भुदरगड पोलीसांच्या ताब्यात दिले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक बी, भीरजकुमार व आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पार पाडली.