For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

उसाच्या दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक; भोसे फाट्यावर 50 हून अधिक ट्रॅक्टर अडवले; शेतकऱ्यांना ऊसतोड न घेण्याचे आवाहन

11:38 AM Oct 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
उसाच्या दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक  भोसे फाट्यावर 50 हून अधिक ट्रॅक्टर अडवले  शेतकऱ्यांना ऊसतोड न घेण्याचे आवाहन
Advertisement
सोनी | वार्ताहर : चालू गळीत हंगामातील उसाच्या दराचा प्रश्न ऐरणीवर आला असून, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन तीव्र करण्यास सुरुवात केली आहे. मिरज तालुक्यातील भोसे फाटा येथे शेतकरी आणि संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रविवारी मध्यरात्रीपासून विविध साखर कारखान्यांकडे जाणारी ऊस वाहतूक रोखली. या आंदोलनामुळे 50 हून अधिक ट्रॅक्टर-ट्रॉली अडवण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आंदोलनाची भूमिका स्पष्ट केल्यानंतर सांगली जिल्ह्यात त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. भोसे येथील शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत भोसे फाटा येथे ऊस वाहतूक रोखली. त्यामुळे ऊस वाहतूकदारांची तारांबळ उडाली असून, साखर कारखान्यांच्या गळीत हंगामासमोरही आव्हान निर्माण झाले आहे.

Advertisement

दर जाहीर होईपर्यंत वाहतूक रोखणार

चालू हंगामातील उसाची पहिली उचल आणि अंतिम दर याबाबत सन्मानजनक तोडगा निघेपर्यंत एकही ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर कारखान्याकडे जाऊ दिले जाणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. शेतकऱ्यांच्या घामाला योग्य मोबदला मिळाल्याशिवाय साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरळीत चालू देणार नाही, असा इशाराही कार्यकर्त्यांनी दिला.

Advertisement

ऊसतोड न घेण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

साखर कारखान्यांनी उसाचा अधिकृत दर जाहीर करून प्रश्न सोडवावा, अशी मागणी करण्यात आली आहे. दराबाबत निर्णय होईपर्यंत भोसे परिसरातील शेतकऱ्यांनी परस्पर ऊसतोड घेऊ नये, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केले आहे. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास परिसरातील गावांमध्येही अशाच प्रकारचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

उसाच्या दरावरून सुरू झालेल्या या आंदोलनामुळे सांगली जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाला पुन्हा एकदा धार आली आहे. साखर कारखानदार आणि शेतकरी संघटना यांच्यात दराबाबत तोडगा कधी निघणार, याकडे आता शेतकरी आणि ऊस वाहतूकदारांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Tags :

.