आरोपी महिलेचा पती वकील आहे, तर त्याची आई एक निवृत्त न्यायाधीश असून त्यांनी वरिष्ठ न्यायिक आणि शैक्षणिक पदांवरही काम केले आहे. आरोपी कुटुंबाच्या प्रभावामुळे तपासात अडथळा येऊ शकतो, असा आरोप पीडितेच्या कुटुंबाने वारंवार केला आहे.
"माझा श्वास गुदमरतोय" भोपाळ प्रकरणातले चॅट आणि सीसीटिव्ही फुटेज बुचकळ्यात टाकणारे ...
मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये एका प्रतिष्ठित कुटुंबात लग्न केल्यानंतर अवघ्या पाच महिन्यांतच, एका ३३ वर्षीय महिलेचा तिच्या सासरच्या घरात मृतदेह आढळला. हादरवून टाकणाऱ्या या घटनेनंतर आता काही गोष्टींचा उलगडा होताच, प्रकरणातील गुंतागुंत वाढली आहे.
मृत्युपुर्वी महिलेचे तिच्या आईसोबत मोबाईलवर चॅटींग आता समोर आले आहे, त्यात माझा श्वास गुदमरतोय, अस्वस्थ वाटत आहे असं महिला आपल्या आईला सांगत आहे, फरार पती, छळ आणि मानसिक आजाराबद्दलचे परस्परविरोधी दावे, तसेच हुंडा छळ आणि हत्येच्या आरोपांची चौकशी सुरू केल्यानंतर आता या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.
पती वकिल सासू निवृत्त न्यायाधीश
मृत महिला मूळची उत्तर प्रदेशातील नोएडा येथील असून १२ मे रोजी कटारा हिल्स परिसरातील तिच्या सासरच्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. हुंडाबळी प्रकरणी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये तिचा वकील पती आणि निवृत्त न्यायाधीश सासू या दोघांचीही नावे आहेत, तर छळ, मारहाण आणि पुरावे नष्ट करण्याच्या आरोपांची विशेष तपास पथक (एसआयटी) चौकशी करत आहे.
आरोपी कुटुंबाची कायदेशीर पार्श्वभूमी, तपासातील अनेक कथित त्रुटी आणि घटनेच्या रात्रीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यामुळे या प्रकरणाने सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली असून लक्ष वेधून घेतले आहे
प्रकरणाचे गूढ वाढले
भोपाळ न्यायालयाने नुकताच पतीचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळला, त्यानंतर पोलिसांनी त्याच्या अटकेसाठी माहिती देणाऱ्यास १०,००० रुपयांचे बक्षीस जाहीर केले. मात्र, आरोपीचा यापूर्वीच अटकपूर्व जामीन मंजूर झाला होता.
पीडितेच्या वडिलांनी जाहीरपणे भीती व्यक्त केली आहे की, जर तात्काळ अटक केली नाही, तर आरोपी उच्च न्यायालयांकडून दिलासा मिळवण्यासाठी “पैसा आणि सत्तेचा” वापर करू शकतात.
'मी अडकली आहे, श्वास गुदमरतोय.
महिलेच्या कुटुंबीयांनी शेअर केलेल्या व्हॉट्सॲप मेसेजेसमध्ये, तिने आपल्या वैवाहिक जीवनात “अडकल्यासारखे”, “गुदमरल्यासारखे” आणि भावनिकदृष्ट्या खचल्यासारखे वाटत असल्याचे वारंवार वर्णन केले आहे .
तिने तिच्या आईला पाठवलेल्या एका मेसेजमध्ये कथितपणे लिहिले होते: “हे लोक मला रडूही देत नाहीत आणि हसण्याचे कारणही देत नाहीत.” दुसऱ्या एका मेसेजमध्ये, तिला “वाईट रीतीने अडकल्यासारखे” वाटत असल्याचे तिने म्हटले.
गर्भपाताच दावा
तिने असाही दावा केला आहे की, गर्भपात करण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर तिच्या पतीने तिच्यावर दुसऱ्या कोणाचे तरी बाळ पोटात असल्याचा आरोप केला. चॅट्सवरून असे सूचित होते की, तिने आपल्या कुटुंबाला भोपाळहून घरी परत नेण्यासाठी वारंवार विनवणी केली होती.
मित्रांना पाठवलेल्या मेसेजेसमधूनही असेच निराशाजनक चित्र समोर आले. तिने एका मैत्रिणीला लग्नाची घाई न करण्याचा सल्ला दिला होता आणि भोपाळमध्ये दिवसभर घरी राहिल्याने चिंता वाढत असल्याचे म्हटले होते, असा आरोप आहे.
सीसीटिव्ही फुटेज आणि गुंतागुंत
घटनेच्या रात्रीचे नवीन सीसीटीव्ही फुटेज तपासात एक महत्त्वाचा पुरावा म्हणून समोर आले आहे. एका क्लिपमध्ये, घटनेच्या काही वेळापूर्वी ती महिला घरातील जिना चढताना दिसत असल्याचे वृत्त आहे . दुसऱ्या क्लिपमध्ये, तिचा पती तिच्यावर दोनदा सीपीआर करण्याचा प्रयत्न करत असताना त्याची आई दुसऱ्या खोलीत जाते, असे म्हटले जाते. नंतर, इतर दोन पुरुष तिला जिन्यावरून खाली आणण्यास मदत करताना दिसतात.