Bhopal Crime आधी तिच्या मद्यधुंद नवऱ्याला घरी सोडले, तिचा विनयंभ केला, अखेर तिच्यावर चाकूने वार केले
मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हबीबगंज परिसरात शनिवारी रात्री उशिरा नशेत असलेल्या पतीला घरी सोडल्यानंतर त्याच्या दोन मित्रांनी एका २५ वर्षीय महिलेचा विनयभंग करून, तिच्यावर चाकूने हल्ला केला अशी माहिती पोलिसांनी दिली. हबीबगंज पोलिसांनी रविवारी आरोपींविरुद्ध घरात घुसणे, विनयभंग, मारहाण आणि हिसकावून घेणे या आरोपांखाली गुन्हा दाखल केला आणि सोमवारी त्यांना न्यायालयात हजर केले, जिथून त्यांना तुरुंगात पाठवण्यात आले.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेचा ३० वर्षीय पती चौकीदार म्हणून काम करतो आणि बंगल्यातील नोकरांच्या क्वार्टरमध्ये कुटुंबासोबत राहतो, तर पिडीता घरकाम करते. तिच्या पतीची मिसरोडमधील जटखेडी आणि मंडीदीप येथील रहिवासी असलेल्या रणजीत आणि सूरज नावाच्या दोन पुरुषांशी मैत्री होती. शनिवारी रात्री सुमारे १० वाजता, त्या तिघांनी आरआरएल ट्रायसेक्शनजवळील दारूच्या दुकानाजवळ एकत्र दारू प्यायली.
आरोपीने कथितरित्या पहारेकऱ्याला अत्याधिक दारू पाजली आणि त्याला मोटारसायकलवरून घरी नेऊन बाहेर बेशुद्ध अवस्थेत सोडून दिले. पत्नी पाणी आणायला बाहेर आली असता, दोन्ही पुरुष तिच्यामागे आत गेले, तिचा विनयभंग केला, झटापटीत तिच्या पाठीत चाकू खुपसला आणि तिचे मंगळसूत्र हिसकावून पळून गेले. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.