असोगा रस्त्यावरील भुयारी मार्गाचे भूमिपूजन उत्साहात
खानापूर : खानापूर रेल्वेस्थानकाच्या विकासाचे काम प्रगतीपथावर असून येत्या काही दिवसात खानापूर रेल्वेस्थानकाचा पूर्णपणे कायापालट करण्यात येणार आहे. खानापूर रेल्वेस्थानक हायटेक करण्यात येईल. तसेच प्रवाशांना उत्तम सेवा पुरवण्यासाठी रेल्वे मंत्रालयाचे प्रयत्न सुरू आहेत. खानापूर तालुक्याचा सर्वच क्षेत्रात नावलौकीक असल्याने खानापूर रेल्वेस्थानक अत्याधुनिक सेवानियुक्त करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. गेल्या अनेक वर्षाची भुयारी मार्गाची मागणी पूर्ण होत असल्याने मला समाधान वाटत आहे. यापुढेही खानापूरच्या विकासासाठी माझे निश्चित प्रयत्न राहतील. तसेच रेल्वेबाबतच्या नागरिकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मी केंद्र पातळीवर रेल्वेच्या आवश्यक सेवा सुविधा उपलब्ध करण्यासाठी पाठपुरावा करणार आहे, असे उद्गार खासदार विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांनी खानापूर-असोगा रस्त्यावर रेल्वे स्थानकानजीक भुयारी मार्गाच्या भूमिपूजन कार्यक्रमावेळी काढले. खासदार विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांच्याच हस्ते मंगळवारी भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी आमदार विठ्ठल हलगेकर, माजी आमदार अरविंद पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, तालुकाध्यक्ष बसवराज सानिकोप, माजी अध्यक्ष संजय कुबल, भाजपच्या राज्य सचिव धनश्री सरदेसाई, पंडित ओगले, चेतन मणेरीकर, बाबुराव देसाई, प्रकाश देशपांडे यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, असोगा, मन्सापूर, खानापूर परिसरातील नागरिक व रेल्वेचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. रेल्वेस्थानकाच्या नजीकच हा भुयारी मार्ग करणार असून या भुयारी मार्गासाठी 18 कोटी 33 लाखाचा निधी मंजूर झाला असून साडेपाच मीटर रुंदीचे दोन भुयारी मार्ग करण्यात येणार आहेत. हे भुयारी मार्ग सिमेंट काँक्रीटचे दोन करण्यात येणार आहेत. यासाठी या ठिकाणी काम सुरू करण्यात येणार आहे. रेल्वेस्थानकाच्या दोन्ही बाजूनी वाहनांना सोयीचे होईल, अशाप्रकारे रस्ता तयार करण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. पाऊस कमी झाल्यावर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असून मे अखेरीस मार्गाचे काम पूर्ण होणार आहे. यासाठी पर्यायी मार्ग काढण्यात येणार आहे. रेल्वे स्थानकाच्या पलीकडील गावानी पुढील काही महिने भुयारी मार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केले आहे.