Crime News: विद्यार्थिनींच्या घोळक्यात कार घुसली, एकजण जागीच ठार, भोगावतीतील घटना
पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली
भोगावती : बसची वाट पाहणाऱ्या विद्यार्थिनींच्या घोळक्यात कार घुसली. यामध्ये एक विद्यार्थिनी ठार झाली. चार विद्यार्थिनी जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रज्ञा दशरथ कांबळे (वय 18, रा कौलव, ता. राधानगरी) असे ठार झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे.
भोगावती महाविद्यालयाच्या विनंती बसथांब्यावर गुरुवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. राजवर्धन सुरेश परीट (वय 17, रा राशिवडे बुद्रुक) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत घटनास्थळावरून व करवीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोगावती महाविद्यालयातील मुली विनंती बसथांब्यावर येऊन गाडीची वाट पाहत थांबल्या होत्या. त्याचवेळी महाविद्यालयाच्या बाजूने कार घेऊन राजवर्धन परीट हा खाली येत होता.
कार वळणावर आल्यावर अचानक त्याचा ताबा सुटून रस्त्याच्या कडेला उभा राहिलेल्या मुलींच्या घोळक्यात घुसली. या अपघातात प्रज्ञा कांबळे गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी रुग्णालयात नेताना वाटेतच तिचा मृत्यू झाला. तर अस्मिता अशोक पाटील (वय 17), सायली उदय सरनोबत (वय 17, दोघी रा. कसबा तारळे), श्रेया वसंत डोंगळे (वय 17, रा घोटवडे), प्रेरणा शिवाजी माने (वय 18, रा आवळी बुद्रुक) या चौघी जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघाताची माहिती समजताच भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दिगंबर मेडसिंगे, संचालक सुभाष पाटील व बाजीराव चौगले, भोगावती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. ए. चौगले, प्रशासन अधिकारी पी. एस. पाटील तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले.
त्यांच्यासह करवीरचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. उपनिरीक्षक नाथा गळवे, पोलीस नाईक किरण वायदंडे, पोलीस कॉन्स्टेबल दिग्विजय पाटील, सुमित्र पोवार यांनी पंचनामा केला.
कौलव गावावर शोककळा
कौलव : बीएच्या प्रथम वर्षात शिकणारी प्रज्ञा कांबळे ही मनमिळाऊ स्वभावाची व वर्गात हुशार होती. तिच्या अपघाती जाण्याने कौलव गावावर शोककळा पसरली आहे. कांबळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. प्रज्ञाच्या कुटुंबीयांना आणि नातेवाईकांना ही बातमी समजताच त्यांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. यावेळी उपस्थितांचेही डोळे पाणावले. गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. बेजबाबदार वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.