कोरेगाव भीमात उसळला भीमसागर
शौर्यदिनी विजयस्तंभास लाखो अनुयायांकडून अभिवादन
► पुणे / प्रतिनिधी
जय भीमचा नारा, फडफडणारे नीळे ध्वज आणि आंबेडकरी चळवळीतील लाखो अनुयायांची विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी उसळलेली गर्दी...अशा वातावरणात कोरेगाव भीमा येथे 207 वा शौर्य दिन बुधवारी साजरा करण्यात आला.
मंगळवारी मध्यरात्रीपासूनच विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. सुमारे 10 लाख अनुयायी विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी पेरणे फाटा परिसरात राज्यासह देशभरातून आले होते. प्रशासनाकडूनदेखील होणारी गर्दी लक्षात घेता योग्य ती खबरदारी घेण्यात आली होती. या वेळी विविध नेतेमंडळींनीदेखील अभिवादनासाठी हजेरी लावली. 207 वर्षांपूर्वी कोरेगाव भीमा येथे झालेल्या लढाईत महार आणि इतर समाजातील सैनिकांच्या पराक्रमामुळे ब्रिटिशांनी पेशव्यांच्या सैन्याचा पराभव केला होता. 1 जानेवारी 1927 ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या विजयस्तंभास भेट देऊन हा इतिहास पुढे आणला. तेव्हापासून याठिकाणी शौर्य दिवस साजरा करण्यास सुरूवात झाली. बुधवारी 207 व्या विजयदिनी विविध पक्ष, सामाजिक संघटनांच्या वतीने अभिवादन सभेचे आयोजन केले होते. समता सैनिक दलासह महार रेजिमेंटकडून विजयस्तंभास मानवंदना देण्यात आली. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, मंत्री दत्तात्रय भरणे, राज्य मंत्री माधुरी मिसाळ, आनंदराज आंबेडकर तसेच इतर नेत्यांनी भेट देत विजयस्तंभाला अभिवादन केले. या वेळी पोलिस आयुक्त अमितेश कुमार, अपर पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे, मनोज पाटील, पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, हिंमत जाधव यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
स्तंभावर प्रशासनाकडून सुरेख नियोजन..
ऐतिहासिक विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी आलेल्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण पोलिस दलाने विजयस्तंभस्थळी केलेली व्यवस्था, तसेच आत व बाहेर जाण्याच्या मार्गिका यामुळे अनुयायांची गैरसोय झाली नाही. पुणे पोलिस दलाकडून 5 हजार 653 जणांचा बंदोबस्त, तर पुणे ग्रामीण पोलिसांकडून चार हजार 800 जणांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आपत्कालीन परिस्थितीत मदतकार्य करण्यासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफची पथके तैनात करण्यात आली होती. याशिवाय जागोजागी पोलिस मदत केंद्र, वॉच टॉवर उभारण्यात आले होते. अभिवादनासाठी आलेल्या अनुयायांच्या वाहनांसाठी 45 ठिकाणी पार्किंगची सोय करण्यात आली होती. तसेच वाहनतळापासून विजयस्तंभाभापर्यंत पीएमपी बसेसच्या माध्यमातून अनुयायांना ने-आण करण्याची मोफत सोयदेखील करण्यात आली होती.