भीमा नदी कोरडी पडल्याने 40 नळ पाणीपुरवठा योजना ठप्प; उजनीतून तातडीने पाणी सोडण्याची माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची मागणी
पाणीटंचाईमुळे नागरिक, शेतकरी संकटात
भीमा नदीचे पात्र अनेक दिवसांपासून कोरडे असल्याने इंदापूर, माढा आणि माळशिरस तालुक्यांसह पंढरपूर शहर व मंगळवेढा परिसरातील पाणीपुरवठा योजनांवर परिणाम झाला आहे. सुमारे 40 नळ पाणीपुरवठा योजना पाण्याअभावी बंद पडल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. त्याचबरोबर जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि चारा-पाण्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे.
या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन हर्षवर्धन पाटील यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. यावेळी त्यांनी नदीकाठच्या गावांमधील पाणीटंचाईची वस्तुस्थिती मांडत उजनी धरणातून भीमा नदीत तातडीने पाणी सोडण्याची मागणी केली.
वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश
हर्षवर्धन पाटील यांच्या मागणीची दखल घेत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. पुणे पाटबंधारे मंडळाचे मुख्य अभियंता संजीव चोपडे, सोलापूरचे जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन आणि उजनी धरणाचे अधीक्षक अभियंता सु. स. खांडेकर यांना यासंदर्भात त्वरित पावले उचलण्यास सांगण्यात आले आहे.
उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्याबाबत लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असा दिलासा जलसंपदा मंत्र्यांनी दिल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. त्यामुळे पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या नागरिक आणि शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आता उजनीतून पाणी सोडण्याबाबत प्रशासन कोणता निर्णय घेते, याकडे संबंधित तालुक्यांतील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
