Begampur Weather : कडाक्याच्या थंडीने भीमाकाठ गारठला
बेगमपूर परिसरात भीमा नदीकाठी प्रचंड थंडीचा प्रभाव
बेगमपूर : भीमा नदीच्या काठी वसलेल्या अनेक गावांना सध्या थंडीला सामोरे जावे लागत आहे. थंडी वाढल्यामुळे नदीकाठचे नागरिक गारठले असून शेतीची कामे उरकून शेतकरी व ग्रामस्थ सातच्या आत घरात जात असल्यामुळे रस्ते निर्मनुष्य दिसतआहेत.
यंदा जिल्ह्यासह भीमाकाठी पाऊस मोठ्या प्रमाणात पडला असून भीमा नदीच्या आसपास असणारे ओढे, नाले अजूनही पाण्याने भरलेले आहेत. नदीकाठचा सर्व परिसर बागायती असल्यामुळे या भागात थंडी प्रचंड जाणवत आहे. दिवस उगवल्यापासून दहा वाजेपर्यंत थंडी वाजत आहे. सायंकाळी सूर्य मावळताच थंडी सुरू होते. थंडीमुळे नागरिक लवकरच आपले घर जवळकरत असल्याचे दिसत आहे.
पहाटे धुक्याचे दाट जाळे रस्त्यावर पसरलेले असते. त्यामुळे वाहन चालकांना खूप काळजी घेत वाहन चालवावे लागत आहे. वृद्ध आणि लहान मुलांना विशेष काळजी घ्यावी लागत आहे. प्रचंड थंडीमुळे उबदार कपड्याचा वापर वाढलेला आहे. रात्री शेकोटी करुन ठिकठिकाणी नागरिक थंडीपासून बचाव करण्याचा प्रयत्न करत आहेत. एकूणच थंडीचा परिणाम सर्वत्र दिसून येत आहे.