भीमा कृषी प्रदर्शनात 13 कोटींची उलाढाल! आजरा घनसाळ तांदळासह अन्नधान्याची उच्चांकी विक्री
तीन दिवसात दहा हजारहून अधिक शेतकरी, नागरिकांची भेट; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज सांगता
कोल्हापूर प्रतिनिधी
मेरी वेदर मैदान येथे सुरु असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील भव्य अशा भीमा कृषी प्रदर्शनात तीन दिवसात 13 कोटी रुपयांची उलाढाल झाली. प्रदर्शनामध्ये आजरा घनसाळ तांदळासह अन्नधान्याची उच्चांकी विक्री झाली. आत्तापर्यंत सुमारे दहा हजारहून अधिक नागरिकांनी भीमा प्रदर्शनास भेट दिली. आज सोमवार 29 रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार व उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदर्शनाची सांगता होणार आहे. दरम्यान रविवारी कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेलेल्यांन खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते विविध पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
भीमा कृषी प्रदर्शनास रविवारी दिवसभर गर्दीचा महापूर होता. प्रदर्शनास कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, कर्नाटक, इचलकरंजी आदी परिसरातील शेतकऱ्यांनी भेट दिली आहे. प्रदर्शनात देश-विदेशातील विविध नामांकित कंपन्यांचा सहभाग आहे. तसेच हरियाणा येथील जगातील सर्वात मोठा 12 कोटींचा गोलू टू रेडा प्रदर्शनाचे खास आकर्षण ठरत आहे. त्याचबरोबर वैताळ बिटल, फायटर कोंबडा, लाला कंधारी म्हैस, मसाई पठार येथील सागर महाडिक यांच्या केदरलिंग गोशाळेतील सहा वर्षाचा कौंनक्रेज जातीचा बाराशे किलो वजनाचा नंदी देखील प्रदर्शनाचे आकर्षण ठरत आहे.
प्रदर्शनात आजरा घनसाळ, काळा तांदूळ, नाचणी, ज्वारी, बाजरी, वरी, राजगिरा,डाळी, कोकम, हळद आदी खरेदीसाठी झुंबड उडाली आहे. रेशीम कोष याची माहितीही पहावयास मिळत आहे. ड्रोनचा वापर करून शेती करण्याचे तंत्र, चारा तयार करणारे मशीन आहे. मोती संवर्धन स्वीट वॉटरचा उपयोग करून मोती घरात बनविलेले आहेत. हे सर्व कृषी प्रदर्शनात पहावयास मिळत आहेत. दरम्यान भागीरथी महिला संस्थेमार्फत प्रदर्शनाच्या तीसऱ्या दिवशीही शेतकरी बांधवांना मोफत झुणका भाकरीची वाटप करण्यात आले.
रविवारी झालेल्या व्याख्यानांमध्ये उसाचे प्रसारित नवीन वाण व लागवड तंत्रज्ञान या विषयावर ऊस पिक संशोधक मध्यवर्ती संशोधन केंद्र पाडेगाव येथली डॉ. दत्तात्रय थोरवे यांनी ऊस आणि त्याची काळजी कशी घ्यायची याची माहिती दिली. ठिबक सिंचनाचा वापर काळाची गरज या विषयावर नेराफिम प्रा. लिमिटेड पुणेचे प्रमुख डॉ. अरुण देशमुख यांनी मार्गदर्शन केले.
दुपारी 1 वाजता होणार समारोप
आज सोमवार 29 रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदर्शनाचा समारोप होणार आहे. यावेळी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री भरमू पाटील, पंचायत राज राज्यमंत्री भारत सरकार कपिल पाटील, महाराष्ट्र राज्य महसूल पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, श्री छत्रपती शाहू ग्रुपचे चेअरमन समरजीत घाटगे, भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा शौमिका महाडिक, खासदार धनंजय महाडिक उपस्थित राहणार आहेत.
विविध पुरस्कारांचे वितरण
कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगीरी केलेल्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. तसेच पिक स्पर्धेतील विजेत्यांनाही पारितोषिक देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, अमल महाडिक, शाहू ग्रुपचे चेअरमन समरजित घाटगे, भाजप महिला प्रदेश उपाध्यक्षा शौमिका महाडिक, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक, महेश जाधव आदी उपस्थित होते.
भीमा कृषी प्रदर्शनात धान्य महोत्सव दालनात तीन दिवसात विक्री झालेला शेतमाल असा :
- सेंद्रीय गूळ : 2000 किलो, इंद्रायणी तांदूळ : 3000 किलो, आजरा घनसाळ : 5000 किलो, रत्नागिरी 24 तांदूळ 2500 किलो, दप्तरी तांदूळ 1500 किलो, सेंद्रीय हळद 500 किलो, जोंधळा जिरगा तांदूळ 1200 किलो, नाचणी व नाचणी पदार्थ : 7000 किलो, जंगल मध 500 किलो, करवंद सरबत 500 लिटर, काकवी 300 लिटर, बेदाणे 500 किलो, केळी 750 किलो.