Sangli crime | भिलवडी पोलिसांची मोठी कामगिरी; शोधले ५.५ लाखांचे गहाळ झालेले २२ मोबाईल!
मोबाईल गहाळ प्रकरणात भिलवडी पोलिसांना मोठे यश
भिलवडी : भिलवडी पोलीस ठाणेयांच्या पथकाने गहाळ झालेल्या मोबाईल शोध मोहिमेत उल्लेखनीय यश मिळवत तब्बल २२ मोबाईल हॅण्डसेट शोधून संबंधित मालकांना परत केले आहेत. या मोबाईलची एकूण किंमत सुमारे ५ लाख ५० हजार रुपये इतकी असल्याची माहिती भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांनी दिली आहे.
याबाबत भिलवडी पोलीस ठाण्यात गहाळ नोंद क्रमांक ३०७/२०२५ दाखल करण्यात आला होता. फिर्यादी तेजस भगवान मोरे (बय ३३, रा. भिलवडी, ता. पलूस, जि. सांगली) यांनी याबाबत तक्रार दिली होती.
भिलवडी परिसरातील गर्दीच्या ठिकाणी तसेच प्रवासादरम्यान व बाजारपेठेत नागरिकांचे मोबाईल गहाळ होण्याच्या घटना वारंवार घडत होत्या. भिलवडी हे महत्त्वाचे ठिकाणअसून येथील आठवडी बाजार पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते. याच गर्दीचा फायदा घेत मोबाईल हरविण्याच्या घटना घडत असल्याचे समोर आले होते.
या प्रकरणाचा तपास करताना सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत तसेच राज्याबाहेरून मोबाईलचा शोध घेतला. पोलीस शिपाई धिरज खुडे यांना मिळालेल्या तांत्रिक माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.