दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी सभासदांना दिलासा; भाऊसाहेब बिराजदार बँकेकडून 6 टक्के लाभांशाची घोषणा
उमरगा : धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भाऊसाहेब बिराजदार अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेने शेतकरी सभासदांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. यंदा सभासदांना 6 टक्के लाभांश देण्यात येणार असल्याची घोषणा बँकेचे चेअरमन प्रा. सुरेश दाजी बिराजदार यांनी केली.
उमरगा येथील शांताई मंगल कार्यालयात बँकेची 30 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी बँकेच्या आर्थिक स्थितीचा तसेच आगामी नियोजनाचा आढावा घेण्यात आला.
बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर. के. शहापुरे यांनी बँकेच्या आर्थिक स्थितीची माहिती दिली. बँकेकडे सध्या 179 कोटी रुपयांच्या ठेवी असून, 86 कोटी रुपयांचे कर्जवितरण झाले आहे. बँकेला 2.41 लाख रुपयांचा निव्वळ नफा झाल्याचे त्यांनी सांगितले.
धाराशिव जिल्ह्यात सात, तर लातूर जिल्ह्यात एक अशा एकूण आठ शाखांमधून बँकेचे कामकाज सुरू आहे. आगामी काळात अन्य जिल्ह्यांमध्येही शाखाविस्तार करण्याचा मानस असल्याचे प्रा. सुरेश बिराजदार यांनी यावेळी सांगितले.
दुष्काळी परिस्थितीत शेतकरी सभासदांना आर्थिक दिलासा देण्याच्या दृष्टीने लाभांशाचा निर्णय महत्त्वाचा असल्याचे बँकेच्या पदाधिकाऱ्यांनी नमूद केले.