For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भाटवडे येथे घराला भीषण आग; महिलेचा होरपळून मृत्यू, गॅस सिलेंडरचा स्फोट टळला

12:32 PM Sep 20, 2026 IST | Tarun Bharat Portal
भाटवडे येथे घराला भीषण आग  महिलेचा होरपळून मृत्यू  गॅस सिलेंडरचा स्फोट टळला
Advertisement

कासेगाव (वार्ताहर) : सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील भाटवडे येथे मध्यरात्री राहत्या घराला लागलेल्या भीषण आगीत 51 वर्षीय महिलेचा होरपळून मृत्यू झाला. भारती सुरेश पवार असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना 19 ऑगस्ट रोजी मध्यरात्री सुमारे 1.45 वाजता घडली.

Advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, भारती पवार या घरात एकट्याच राहत होत्या. त्यांच्या पतीचे यापूर्वीच निधन झाले असून, त्यांना दोन विवाहित मुली आहेत. घराला लाकडी माळा तसेच मोठ्या प्रमाणात जळण साठवून ठेवण्यात आले होते. त्यामुळे आग लागल्यानंतर काही वेळातच तिने रौद्ररूप धारण केले. प्राथमिक माहितीनुसार, विद्युत शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

आगीची तीव्रता अधिक असल्याने भारती पवार यांना घराबाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. आगीत गंभीररीत्या भाजल्याने त्यांचा मृत्यू झाला.

Advertisement

घटनेची माहिती मिळताच माजी उपसरपंच काशीलिंग तिवले यांच्यासह राहुल मोरे, विकास शेळके, तुकाराम मोहिते, विकास गणपते, प्रकाश निकम, पवन पवार, रितेश औताडे तसेच गावातील गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले.

कासेगाव पोलिसांच्या सूचनेनुसार ईश्वरपूर नगरपालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. सुमारे तासभराच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.

गॅस सिलेंडरचा स्फोट टळला

घरात गॅस सिलेंडर असल्याने परिस्थिती अधिक धोकादायक बनली होती. मात्र ग्रामस्थ आणि अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे सिलेंडरचा स्फोट टळला. सिलेंडरचा स्फोट झाला असता तर शेजारील घरांनाही मोठा धोका निर्माण झाला असता. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

या घटनेची माहिती शहाजी आत्माराम पवार यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्याची कार्यवाही सुरू आहे. या दुर्घटनेमुळे भाटवडे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Advertisement
Tags :

.