भारती टेलिकॉम 10,500 कोटी उभारणार
चालू आर्थिक वर्षातील सर्वात मोठा बाँड इश्यू ठरणार
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
भारती एअरटेलची होल्डिंग कंपनी भारती टेलिकॉम 10,500 कोटी रुपयांपर्यंतची रक्कम उभारण्याची योजना आखत असल्याची माहिती आहे. दोन- तीन वर्षे आणि दोन महिन्यांत परिपक्व होणाऱ्या बाँडच्या विक्रीद्वारे ही रक्कम उभारण्याची योजना तयार केली जाणार आहे. हा इश्यू पूर्णपणे सबक्राइब झाला तर तो चालू आर्थिक वर्षातील सर्वात मोठा बाँड इश्यू ठरणार असल्याचा दावा केला जात आहे. या बाँडचा वार्षिक कूपन दर अनुक्रमे 7.35 टक्के आणि 7.45 टक्के असेल. भारती टेलिकॉमने नोव्हेंबर 2024 मध्ये बॉण्ड विक्रीद्वारे 11,150 कोटी रुपये उभारले. म्युच्युअल फंड त्यात प्रामुख्याने गुंतवणूक करतील अशी अपेक्षा आहे. परदेशी आणि खासगी बँकादेखील प्रमुख खरेदीदार असण्याची शक्यता आहे.
एएए रेटिंग
क्रिसिल आणि केअरने या बाँडला एएए रेटिंग दिले आहे. नोव्हेंबर ते डिसेंबर दरम्यान कंपनीची 9,750 कोटी रुपयांची कर्ज थकबाकी आहे. 2027 ते 2034 या काळात 16,150 कोटी रुपयांचे अतिरिक्त कर्ज फेडायचे आहे. पहिल्या तिमाहीत कॉर्पोरेट बाँड जारी करण्यात तेजी आल्यानंतर, दुसऱ्या तिमाहीत कर्ज घेण्याचा खर्च वाढल्याने व्यवहार मंदावले.