भारती एंटरप्राईझेस घेणार ब्रिटीश टेलिकॉममध्ये 24 टक्के हिस्सेदारी
34,000 कोटी रुपयांच्या कराराची शक्यता : मंजुरीनंतर अन्य खरेदी होणार
नवी दिल्ली :
अब्जाधीश सुनील भारती मित्तल यांच्या नेतृत्वाखालील भारती एंटरप्रायझेस यूके टेलिकॉम कंपनी बीटी ग्रुप पीएलसीमधील 24.5 टक्के हिस्सेदारी खरेदी करणार आहे. सुरुवातीला भारती टेलिव्हेंचर्स 9.99 टक्के हिस्सेदारी खरेदी करणार आहे. ही खरेदी केल्यानंतर, आवश्यक नियामक मंजूरी मिळाल्यानंतर उर्वरित 14.51 टक्के हिस्सेदारी खरेदी करण्याची प्रक्रिया पार पाडली जाईल.
अशा प्रकारे, भारती जागतिक ब्रिटीश टेलिकॉम क्षेत्रात मजबूत उपस्थिती प्रस्थापित करेल. हिस्सेदारी अल्टाइस यूकेकडून खरेदी केली जाणार आहे. अल्टाइस युके ही आघाडीची दूरसंचार आणि मास मीडिया कंपनी अल्टाइस युरोपची सहकारी आहे.
बीटी ग्रुप पीएलसी ही युकेमधील आघाडीची स्थिर आणि मोबाइल क्षेत्रातील कंपनी आहे. अल्टाइस युरोप त्याच्या उच्च दर्जाचे नेटवर्क आणि नाविन्यपूर्णतेसाठी ओळखले जाते. ब्रिटीश टेलिकॉम समूहातील 24.5टक्के भागभांडवल खरेदी करण्याच्या या धोरणात्मक गुंतवणुकीमुळे भारत आणि युनायटेड किंगडम यांच्यातील दूरसंचार क्षेत्रात नव्याने संबंध प्रस्थापित होतील, असा भारती एंटरप्रायझेसचा विश्वास आहे.
34 हजार कोटीचा व्यवहार
यायोगे आगामी काळात दोन्ही देशांदरम्यान एआय 5जी संशोधन आणि कोर अभियांत्रिकी यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात सहकार्याला चालना मिळेल. दोन्ही कंपन्यांमधील संबंध दोन दशकांहून अधिक जुने आणि मजबूत आहेत. हा करार जवळपास 34 हजार कोटी रुपयांमध्ये होऊ शकतो.
भारती ग्लोबलने या व्यवहारात ब्रिटीश कंपनीला कंपनी किती पैसे देणार याचा खुलासा केलेला नाही. बाजारातील तज्ञांचे म्हणणे आहे की, बीटीच्या अंदाजे 17 अब्ज डॉलर्स (1.43 लाख कोटी) मूल्यानुसार हा करार सुमारे 4 अब्ज डॉलर्सचा (34 हजार कोटी) असू शकतो. या कराराच्या बातमीने लंडनमध्ये बीटी शेअर्स 7.36 टक्के वाढत बंद झाले.