भारती एंटरप्रायझेस स्टारलिंकपेक्षा पुढे
इलॉन मस्क यांच्या आरोपांवर सुनील मित्तल यांचे भाष्य : ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरममधील कार्यक्रमातून संवाद
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
भारती एंटरप्रायझेस कंपनी कतारमधील इलॉन मस्कच्या स्टारलिंकपेक्षा खूप पुढे आहे. कंपनीने या आवश्यक मंजुऱ्यांसाठी 5 वर्षांपूर्वीच अर्ज केला होता. कंपनीचे उपग्रहही तयार आहेत. सर्व सरकारी मंजुऱ्या मिळाल्यानंतर आम्ही तत्काळ सेवा सुरू करू, असे सांगत स्टारलिंकचे प्रमुख इलॉन मस्क यांनी केलेल्या आरोपांवर सुनील मित्तल यांनी उत्तर दिले आहे. ते, ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरममध्ये बोलत होते.
मस्क यांचा आरोप
मस्क यांनी ‘एक्स’वर एक पोस्ट शेअर करून असा आरोप केला होता की, काही धनदांडगे म्हणजेच उद्योगपतींनी त्यांच्या स्टारलिंक या सॅटेलाइट इंटरनेट सेवेला भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्यापासून रोखले आहे. मस्क म्हणाले की, भारतातील दूरसंचार क्षेत्रातील अब्जाधीशांना आपली मत्तेदारी आणि लोकांवरील पकड कायम ठेवायची आहे असेही ते म्हणाले होते. भारतातील सॅटेलाइट कनेक्टिव्हिटीची तयारी प्रगत स्तरावर आहे. मंजुरी मिळाल्यानंतर, भारती आपल्या सेवा अशा दुर्गम भागांमध्येही विस्तारू शकते जिथे मोबाईल नेटवर्क पोहोचू शकत नाही. यासोबतच, त्यांनी डिजिटल वस्तू आणि दूरसंचार सेवांवरील कर कमी करण्याची मागणी केली, जेणेकरून डिजिटल तंत्रज्ञान देशाच्या आर्थिक विकासात मदत करू शकेल. अर्थव्यवस्था मजबूत करण्यात डिजिटल पायाभूत सुविधांची महत्त्वाची भूमिका असल्याचे मित्तल यांनी म्हटले.
एआयवर लवकरच नियम बनवावेत
सुनील मित्तल यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) वर लवकरात लवकर नियम आणि धोरणे बनवण्याबद्दल भाष्य केले. ते म्हणाले की, एआयचा वेग इतका जास्त आहे की सरकारांना त्यानुसार नियम तयार करता येत नाहीत. भारत एआयच्या वापराबाबत आणि सुरक्षेबाबत एक सल्लापत्र (कन्सल्टेशन पेपर) देखील तयार करत आहे.
सॅटेलाइट इंटरनेट कंपन्यांना परवाने मिळाले
- रिलायन्स जिओ सॅटकॉम
- भारती एअरटेल समर्थित युटेलसेट वनवेब
- इलॉन मस्क यांची प्रमुख स्टारलिंक
तथापि, सरकारने हे देखील स्पष्ट केले आहे की या सर्व परवानाधारक कंपन्यांची सुरक्षा मंजुरी अद्याप प्रलंबित आहे. याशिवाय, सॅटेलाइट स्पेक्ट्रमच्या दरांची चौकटही ठरवली जात आहे. सर्व आवश्यक अटींची पूर्तता झाल्यानंतर भारतात या सेवा सुरू केल्या जाऊ शकतात.
स्टारलिंकला जून 2025 मध्ये मंजुरी
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, इलॉन मस्क यांची स्टारलिंक 2022 पासून व्यावसायिक परवान्याच्या प्रतीक्षेत होती. जून 2025 मध्ये, कंपनीला भारताच्या दूरसंचार मंत्रालयाकडून प्रक्षेपणासाठी मंजुरी मिळाली.
भारतीचे प्रमुख उपग्रह 5 वर्षांपासून तैनात
यावर सुनील मित्तल म्हणाले की, भारतीचे ग्राउंड नेटवर्क गेल्या 3 वर्षांपासून पूर्णपणे तयार आहे. कंपनीचे उपग्रह गेल्या 5 वर्षांपासून तैनात आहेत. सरकारकडून सर्व आवश्यक मंजुऱ्या मिळताच, भारती देशभरात त्वरित आपल्या सेवा सुरू करण्यास तयार आहे.
