भारती एअरटेलने कमावला 4160 कोटीचा नफा
नफ्यात 157 टक्के वाढ : महसुलातही दमदार कामगिरी
कोलकाता :
दूरसंचार क्षेत्रातील कंपनी भारती एअरटेल यांनी आपला तिमाही निकाल जाहीर केला असून कंपनीने जूनच्या तिमाहीमध्ये 4160 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. वर्षाच्या आधारावर पाहता नफ्यामध्ये 157 टक्के वाढ दिसली आहे. एक वर्षाच्या आधी समान तिमाहीत कंपनीने 1613 कोटी रुपयांचा नफा कमावला होता.
एप्रिल ते जूनच्या पहिल्या तिमाहीत भारती एअरटेलने 29,046 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे. आर्थिक वर्ष 2024 च्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत महसूल 10 टक्के वाढला आहे. एअरटेलचे देशभरामध्ये 41 कोटी ग्राहक असून जागतिक स्तरावर ग्राहकांची संख्या 56.8 कोटी इतकी आहे.
वर्षभरात समभागाचा 64 टक्के परतावा
भारती एअरटेलचे निकाल जाहीर झाल्यानंतर शेअर बाजारामध्ये एअरटेलचे समभाग सोमवारी 5 ऑगस्ट रोजी 1.66 टक्के इतके घसरत 1469 रुपयांवर बंद झाले. कंपनीच्या समभागाने एक महिन्यात 2.75 टक्के आणि सहा महिन्यांमध्ये 31.92 टक्के परतावा दिला आहे. मागच्या एक वर्षामध्ये समभागाने 64 टक्के परतावा दिला असून 1 जानेवारी 2024 ते आतापर्यंत समभाग 45 टक्केपर्यंत वर चढला आहे. कंपनीचे बाजार भांडवल मूल्य 8.82 लाख कोटी रुपयांवर पोहचले आहे.