भारत विकास परिषदतर्फे महिला दिन विविध उपक्रमांनी साजरा
बेळगाव : भारत विकास परिषद बेळगाव आयोजित आंतरराष्ट्रीय महिला दिन कार्यक्रमात शहरातील तीन कर्तबगार महिलांचा विशेष पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. डॉ. माधुरी हेब्बाळकर, नाट्याकर्मी पद्मा कुलकर्णी व प्राचार्या निशा राजेंद्रन यांचा सत्कारमूर्तींमध्ये समावेश होता. टिळकवाडी येथील जी. जी. चिटणीस शाळेच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या प्रारंभी अक्षता मोरे यांनी संपूर्ण वंदेमातरम सादर केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते भारतमाता व स्वामी विवेकानंद प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन झाले. परिषदेचे अध्यक्ष विनायक मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य पांडुरंग नायक यांनी भारत विकास परिषदेची ध्येयधोरणे स्पष्ट केली. प्रांत अध्यक्ष स्वाती घोडेकर यांनी सत्कारमूर्तींची ओळख करून दिली. त्यानंतर डॉ. हेब्बाळकर, पद्मा कुलकर्णी, निशा राजेंद्रन यांनी मनोगत व्यक्त केले.दुसऱ्या सत्रात ‘होम मिनिस्टर’ खेळांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महिलांनी हिरीरीने भाग घेतला. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाला उषा देशपांडे, उमा यलबुर्गी, शुभांगी मिराशी, लक्ष्मी तिगडी, योगीता हिरेमठ, प्रिया पाटील, स्मिता भुजगुरव, तृप्ती देसाई आदी उपस्थित होते.