मनोज जरांगेंच्या एकेरी भाषेवरून सत्ताधाऱ्यांचा इशारा; गोगावले, सरनाईक आक्रमक
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू असतानाच त्यांच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सरकारमधील मंत्र्यांवरील टीकेवरून सत्ताधारी नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. जरांगे यांनी आपल्या नेत्यांबाबत संयमाने बोलावे, असे आवाहन मंत्री उदय सामंत यांनी केले आहे. तर मंत्री प्रताप सरनाईक आणि भरत गोगावले यांनीही एकेरी भाषेचा वापर खपवून घेतला जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या मागण्यांवर ठाम भूमिका घेतली असून, सरकारकडून मागण्या मान्य झाल्याचे सांगण्यात आल्यानंतरही त्यांनी आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १२ तारखेला बैठक घेऊन मुंबईकडे कूच करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे आहेत.
‘आमच्या नेत्यांबद्दल बोलाल तर आम्हीही रस्त्यावर उतरू’
मंत्री प्रताप सरनाईक यांनी जरांगे यांच्या भूमिकेवर प्रतिक्रिया देताना लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला असल्याचे मान्य केले. मात्र, मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजासाठी घेतलेल्या निर्णयांचाही विचार केला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
मराठा समाजासाठी सरकारने घेतलेल्या निर्णयांबाबत बोलताना सरनाईक यांनी शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात अपशब्द वापरले गेले तर ते सहन केले जाणार नाहीत, असा इशारा दिला. आमच्या नेत्यांबद्दल अशा प्रकारची भाषा वापरली गेल्यास कार्यकर्तेही रस्त्यावर उतरू शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले.
भरत गोगावले यांचाही जरांगेंना इशारा
मंत्री भरत गोगावले यांनीही जरांगे यांच्या टीकेवर तीव्र प्रतिक्रिया दिली. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारने घेतलेल्या विविध निर्णयांचा उल्लेख करत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात मराठा समाजासाठी अनेक पावले उचलण्यात आल्याचा दावा केला.
हैदराबाद गॅझेटसह आरक्षणाशी संबंधित मागण्यांवर चर्चा होऊ शकते; मात्र राजकीय नेत्यांवर टीका करताना मर्यादा पाळल्या पाहिजेत, असे गोगावले यांनी म्हटले. जरांगे यांनी राजकीय विषयांवर भाष्य केले तर त्याला राजकीय पातळीवर उत्तर दिले जाईल, अशी भूमिका त्यांनी मांडली.
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत एकेरी भाषेचा वापर सुरू राहिल्यास ‘जशास तसे’ उत्तर दिले जाईल, असा इशाराही गोगावले यांनी दिला. आपणही मराठा समाजातून आलो असून आंदोलन आणि संघर्षाचा अनुभव असल्याचे सांगत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
उदय सामंतांकडून संयमाचे आवाहन
दरम्यान, मंत्री उदय सामंत यांनी मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या वक्तव्यांमध्ये संयम राखण्याचे आवाहन केले. मराठा समाजासाठी निर्णय घेणाऱ्या नेत्यांवर वैयक्तिक किंवा अपमानास्पद टीका करणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले.
एकीकडे जरांगे यांचे आंदोलन सुरू आहे, तर दुसरीकडे आरक्षणाच्या मुद्द्यावर ओबीसी आणि आदिवासी समाजाकडूनही विविध भूमिका समोर येत आहेत. त्यामुळे आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे.
आता जरांगे पाटील मुंबईकडे कूच करण्याच्या भूमिकेवर कायम राहतात की सरकारसोबतच्या चर्चेतून तोडगा निघतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याचवेळी नेते आणि आंदोलक यांच्यातील वाढता शाब्दिक संघर्ष आगामी काळात कोणते वळण घेतो, हेही महत्त्वाचे ठरणार आहे.