For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Solapur Bharat Gogawale : रोजगार हमीचे केंद्राकडे 3800 कोटी थकित

03:32 PM Apr 20, 2025 IST | Snehal Patil
solapur bharat gogawale   रोजगार हमीचे केंद्राकडे 3800 कोटी थकित
Advertisement

बाराशे कोटींचा निधी आता मिळाला, मंत्री भरत गोगावले यांची माहिती

Advertisement

सोलापूर : राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून राज्यात विविध कामे घेण्यात येतात. यासाठी केंद्र शासनाकडून अनुदान देण्यात येते. राज्यात झालेल्या विविध कामांसाठी केंद्र शासनाकडे एकूण 3800 कोटी रुपयांचा निधी प्रलंबित होता. यापैकी आता 1200 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून त्याचे वितरण मजुरांना होत असल्याची माहिती रोजगार हमी योजनेचे मंत्री भरत गोगावले यांनी दिली.

सोलापुरातील नियोजन भवन येथील सभागृहात शनिवारी आयोजित जिह्यातील रोजगारहमी योजनाच्या कमांचा आढावा रोहयो मंत्री भरत गोगावले यांनी घेतला. याप्रसंगी त्यांनी मार्गदर्शक सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर, उपजिल्हाधिकारी रोहयो अंजली मरोड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 1 चे कार्यकारी अभियंता मनोज ठाकरे, क्रमांक 2 चे संतोष कुलकर्णी, पंढरपूरचे अमित निमकर यांच्यासह संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते.

Advertisement

मंत्री गोगावले म्हणाले, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जवळपास 265 योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गावातील पात्र शेतकरी व मजूर यांना लाभ उपलब्ध करून दिला जात आहे. सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून रोजगार हमी योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकरी व मजुरांना उपलब्ध व्हावा तसेच त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी रोजगार हमी योजनेत नव संकल्पना राबवाव्यात.

रोजगार हमी योजनेअंतर्गत कुशल कामाची 2600 कोटींची मजुरी तर अकुशल कामाचे बाराशे कोटी केंद्र शासनाकडे थकीत होते. त्या अनुषंगाने केंद्रीय कृषिमंत्री यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यानुसार अकुशल कामाचे बाराशे कोटी रुपये राज्याला प्राप्त झालेले असून तो निधी सोमवारपासून प्रत्येक जिह्याला वितरित करण्यात येणार आहे. हा वितरित झालेला निधी तत्काळ संबंधित मजुरांच्या बँक खात्यावर जमा करावा व उर्वरित 2600 कोटींचा निधीही पुढील आठवड्यात राज्य शासनाकडे प्राप्त होईल, अशी माहिती गोगावले यांनी दिली.

रोहयो अंतर्गत वन औषधी लागवड, बांबू लागवड यासारख्या नवीन योजना राबवल्या जात असून संबंधित शासकीय विभागांनी अन्य नव संकल्पना राबवून मजूर व शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळवून द्यावा. प्रत्येक गावात रोजगार हमी योजनेचे कामे सुरू राहतील व मजुरांचे स्थलांतर इतरत्र होणार नाही अशा रीतीने संबंधित अधिकाऱ्यांनी कामे केली पाहिजेत. या कामात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करू नये, असे आदेशही गोगावले यांनी दिले.

प्रारंभी उपजिल्हाधिकारी रोहयो अंजली मरोड यांनी सोलापूर जिह्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत विविध यंत्रणामार्फत सुरू असलेल्या कामांची माहिती दिली. यामध्ये जिह्यात विविध यंत्रणा मार्फत एक हजार दोनशे एक कामे सुरू असून त्या कामावर 732 मजूर काम करत आहेत. या कामांमध्ये जिल्हा परिषद व कृषी विभागाची कामे अधिक असल्याचे त्यांनी सांगितले. जिह्यातील रोजगार हमी योजनेवरील 96टक्के मजुरांचे आधार लिंक करण्यात आलेले असून या सर्व मजुरांना त्यांची मजुरी थेट त्यांच्या बँक खात्यावर दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी कृषी विभागांतर्गत सुरू असलेल्या कामकाजाची माहिती देऊन फळ उत्पादनात सोलापूर जिह्याचे काम चांगले असल्याचे सांगितले. जिल्हा केळी निर्यातीत आघाडीवर असून लवकरच उत्पादनात ही जळगाव जिह्याला मागे टाकेल असे त्यांनी सांगितले. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत रोजगार हमी योजना कामांचा 26 कोटीचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली.

तक्रार झाली तरीही योजना राबवा

योजना राबवत असताना कामाविषयी तक्रारी होत असतात, परंतु अधिकाऱ्यांनी तक्रारी होत आहेत म्हणून रोजगार हमीची कामे उपलब्ध करून न देणे हे चुकीचे आहे. अधिकाऱ्यांनी याविषयी अधिक सजग भूमिका घेऊन प्रत्येक गावात मजूर व शेतकऱ्यांना रोजगार हमीची कामे उपलब्ध करून दिली पाहिजेत. चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे असल्याचेही गोगावले यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.