भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडला मिळाली मोठी ऑर्डर
संरक्षण मंत्रालयाकडून मिळाले कंत्राट
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांना अलीकडेच संरक्षण मंत्रालयाने 5336 कोटी रुपयांची ऑर्डर देऊ केली आहे. या नव्या ऑर्डरनंतर कंपनीचे समभाग शुक्रवारी तीन टक्के वाढून 169 रुपयांवर पोहोचले होते. संरक्षण मंत्रालयाने 10 वर्षाच्या कालावधीसाठी भारतीय सेनेकरिता इलेक्ट्रॉनिक फ्यूज अधिग्रहणासाठी भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड सोबत महत्त्वाचा करार केला आहे.
आतापर्यंत 23 हजार कोटीचे कंत्राट
मोदी सरकार यांच्या आत्मनिर्भर भारत या मोहिमेच्या माध्यमातून सदरचे कंत्राट कंपनीला दिले असल्याची माहिती आहे. त्यामुळे आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांच्याकडे एकंदर 23,176 कोटी रुपयांच्या कामाचे कंत्राट प्राप्त झाले असल्याची माहिती आहे. एकंदर मिळालेल्या कंत्राटाचा विचार करून तज्ञांनी कंपनीच्या समभागामध्ये आगामी काळात तेजी राहणार असल्याचे मत व्यक्त केले आहे.
समभाग वधारण्याचे संकेत
ब्रोकरेज फर्म युबीएस यांनी कंपनीचा समभाग 205 रुपयापर्यंत वाढू शकतो, असे म्हटले आहे. गेल्या वर्षभरामध्ये पाहता कंपनीचा समभाग जवळपास 68 टक्के वाढलाय. भारत सरकारच्या मालकीअंतर्गत भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ही कंपनी कार्यरत आहे. हवाई क्षेत्र व संरक्षण विषयक इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांची निर्मिती कंपनी करते.