भारत कोकिंग कोलचा आयपीओ 9 रोजी होणार खुला
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोल इंडियाची मालकी असणाऱ्या भारत कोकिंग कोल लिमिटेडचा आयपीओ या आठवड्यात बाजारात खुला होणार आहे. सदरचा आयपीओ 9 जानेवारी रोजी गुंतवणूकीसाठी खुला होणार असून 13 जानेवारी रोजी गुंतवणूकीसाठी बंद होणार आहे. 2026 सालचा मेनबोर्डवर सादरीकरण केला जाणारा हा पहिला आयपीओ असणार आहे.
आयपीओची किंमत 21 ते 23 रुपये प्रति समभाग अशी निश्चित करण्यात आली असून एका लॉटमध्ये 600 समभाग असतील. रिटेल गुंतवणूकदारांना 600 समभागांसाठी बोली लावता येणार आहे. एका लॉटसाठी 13,800 रुपये गुंतवावे लागणार आहेत. सदरच्या आयपीओतून कंपनी 1078 कोटी रुपयांची उभारणी करणार असून आयपीओ पूर्णपणे ऑफर फॉर सेलअंतर्गत असेल. इशुअंतर्गत कोल इंडियाचे प्रवर्तक 46.57 कोटी समभाग विक्री करणार आहेत. आयपीओमधील 50 टक्के हिस्सेदारी पात्रताधारक संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी, 35 टक्के रिटेल गुंतवणूकदारांसाठी व 15 टक्के बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव असणार आहे. 16 जानेवारीला कंपनीचे समभाग शेअरबाजारात सुचीबद्ध होतील, असे सांगितले जात आहे.