For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Vari Pandharichi 2025: आमुचिया कुळी पंढरीचा नेम

03:46 PM Jul 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
vari pandharichi 2025  आमुचिया कुळी पंढरीचा नेम
Advertisement

एकदा विजयनगर साम्राज्याचा अधिपती राजा कृष्णदेवराय पंढरपूरला आला

Advertisement

By : मीरा उत्पात 

ताशी : अवघ्या महाराष्ट्राची धर्मधारा ज्याच्या भोवती फिरते तो राजस, सुकुमार, अगणित लावण्य असलेला तेजाचा पुतळा विठ्ठल! तो त्याला भेटायला आलेल्या सगळ्या भक्तांच्या हृदयाचा ठाव घेतो. मग तो राव असो की रंक! एकदा विजयनगर साम्राज्याचा अधिपती राजा कृष्णदेवराय पंढरपूरला आला.

Advertisement

त्याने विठ्ठलाचे तेजस्वी रूप, चेहऱ्यावरचे मोहक हास्य पाहिले आणि तो त्याच्या प्रेमात पडला. परत विजयनगरला गेल्यावर त्याला विठ्ठलाविना चैन पडेना. राज्याच्या कामकाजामुळे वारंवार पंढरपूरला येणेही जमेना. मग तो देवाचे नित्य दर्शन व्हावे म्हणून विठ्ठलालाच पंढरपूरहून विजयनगरला आणायचे ठरवतो.

राजाने जर काही ठरवले तर कोणीच काही करू शकत नाही! कोणाच्या भावनेचा विचार न करता राजा विठ्ठल मूर्ती राजधानी विजयनगरला नेण्याचे ठरवतो. विठ्ठलासाठी भव्य, सुंदर मंदिर उभारतो. आणि विठ्ठलाला हंपीला घेऊन येतो. इकडे पंढरपूरला वारीला भानुदास महाराजांसह सगळे वारकरी जमतात. पण देवळात विठ्ठलाची मूर्ती नाही हे पाहून साऱ्यांना खूप वाईट वाटते.

वारकरी अतिशय दु:खी होऊन विलाप करायला लागतात. तेव्हा हंपीवरून विठ्ठलाची मूर्ती परत आणण्याची जबाबदारी भानुदास महाराज घेतात. या कामात यश मिळावे म्हणून ते विजयनगरला जाताना पंढरपूरच्या त्याकाळच्या दक्षिण सीमेवर मारूतीरायाची स्थापना करून त्याचे आशीर्वाद मागतात. त्या मारूतीला काळा मारूती असे संबोधले जाते.

भानुदास महाराज विजयनगरला आल्यावर विठ्ठलाला ‘पंढरपूरला वारीला आलेले वारकरी तुझ्याविना दु:खी झाले आहेत. तुझी आतुरतेने वाट पहात आहेत आणि तू मात्र राजभोग घेत इथे बसला आहेस.’ असे म्हणतात. त्यावेळी विठ्ठल सुद्धा ‘भानुदासा, मला पण इथे करमत नाही. पंढरपूर, चंद्रभागा, पुंडलिक, माझे वारकरी साऱ्यांची आठवण येते आहे.

तू मला इथून घेऊन चल.’ असे सांगून आपल्या गळ्यातील तुळशीचा हार भानुदासांच्या गळ्यात घालतो. तुळशीच्या हाराबरोबर राजाने विठ्ठलाला अर्पण केलेला नवरत्नांचा हारही भानुदासांच्या गळ्यात येतो. पुजारी देवाला उपचार करण्यासाठी आल्यावर त्याला विठ्ठलाच्या गळ्यात नवरत्नांचा हार नसल्याचे लक्षात येते.

राजाला तो ही बाब सांगतो. राजा हाराचा शोध घ्यायला आपले शिपाई पाठवतो. भानुदास तुंगभद्रा नदीकिनारी संध्या करत बसले असता शिपायांना त्यांच्या गळ्यातील विठ्ठलाचा हार दिसतो. ते राजाला वर्दी देतात. राजाला या गोष्टीचा खूप राग येतो. तो भानुदासांना या कृत्याबद्दल सुळावर चढवण्याची शिक्षा फर्मावतो.

तुंगभद्रा नदीकिनारी सूळ रोवण्यात येतो. राज्यातील सारे प्रजानन तिथे जमतात. या साऱ्या प्रकाराने भानुदास महाराज व्यथित होऊन विठ्ठलाचा धावा करतात. आणि एक चमत्कार घडतो. भानुदास महाराजांना ज्या सुळावर चढवण्यात येणार असते त्याला पालवी फुटते. राजा हा चमत्कार पाहून आश्चर्यचकित होतो. त्याला विठ्ठलाचे प्रयोजन कळते. मला इथे करमत नाही.

पंढरपूरला जायचे आहे, असा राजाला विठ्ठलाचा स्वप्नदृष्टांत होतो. राजा आपला हट्ट सोडून देऊन भानुदास महाराजांच्या बरोबर विठ्ठल मूर्ती परत पंढरपूरला पाठवतो. टाळ-मृदंगाच्या जयघोषात विठ्ठल मूर्ती परत पंढरपूरला सुखरूप येते. जाताना स्थापन केलेल्या काळ्या मारूतीच्या देवळात काही काळ मूर्तीला विसावा देतात.

भानुदास महाराज मारूतीरायाचे आभार मानतात. आजही नगर प्रदक्षिणा करताना दिंड्या तिथे थांबून विजयाचा अभंग म्हणतात. या घटनेचे स्मरण करून नगर प्रदक्षिणेला निघतात. तसेच देवळात सोळखांबीत जय विजयजवळ स्थापन केलेल्या भानुदास महाराजांच्या दगडी पादुका या घटनेची साक्ष देतात.

तिथे दरवर्षी मोठा उत्सव साजरा केला जातो. भक्ती बळावर राजाला जिंकून विठ्ठल मूर्ती परत पंढरपूरला आणली त्या भानुदास महाराजांची विठ्ठल भक्ती खूप अलौकिक होती.

Advertisement
Tags :

.