भंडारी, ताराराणीकडे बाबुराव ठाकुर चषक
भंडारी ब, सेंट जॉन काकती उपविजेते : प्रवीण जुट्टपन्नावर व मयुरी कंग्राळकर उत्कृष्ट खेळाडू
बेळगाव : बेळगाव जिल्हा हॉकी संघटना एसकेई सोसायटी, जीएसएस महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने बाबुराव ठाकुर आंतर शालेय हॉकी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मुलांच्या गटात एम. आर. भंडारी अ ने तर मुलींच्या गटात ताराराणी खानापूरने सेंट जॉन काकतीचा पराभव करुन बाबुराव ठाकुर चषक पटकाविला. प्रवीण जुट्टपन्नावर व मयुरी कंग्राळकर यांनी उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. आरपीडी महाविद्यालयावर खेळविण्यात आलेल्या या हॉकी स्पर्धेत पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मुलांच्या गटात भंडारी अ संघाने हेरवाडकर अ संघाचा 2-0 तर दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भंडारी ब ने हेरवाडकर ब संघाचा पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत भंडारी अ ने ब संघाचा 5-0 असा पराभव केला. सामन्याच्या 11 व्या मिनिटाला समर्थ करडीगुद्दीच्या पासवर प्रवीण जुटपन्नावरने पहिला गोल केला. 15 व्या मिनिटाला समर्थ करडीगुद्दीने दुसरा गोल करुन पहिल्या सत्रात 2-0ची आघाडी मिळवून दिली. सामन्याच्या 23 व्या मिनिटाला प्रवीण जुटपन्नावरने तिसरा गोल केला. 28 व्या मिनिटाला अशोक यळ्ळूरकरने चौथा तर 33 व्या मिनिटाला आकाश खाडेने पाचवा गोल करुन 5-0 ची महत्वाची आघाडी मिळवून दिली. या सामन्यात ब संघाला गोल करण्यात अपयश आले. मुलींच्या गटात पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ताराराणी खानापूरने जी. जी. चिटणीस संघाचा 1-0 असा निसटता पराभव केला.
मयुरी कंग्राळकरने एकमेव गोला केला. अंतिम सामन्यात ताराराणी खानापूरने सेंट जॉन काकतीचा 2-1 असा पराभव केला. सामन्याच्या 18 व्या मिनिटाला अनुराधा मयेकरच्या पासवर मयुरी कंग्राळकरने पहिला गोल केला. तर 28 व्या मिनिटाला अनुराधा मयेकरने पचाव फळीला चकवत दुसरा गोल करुन 2-0 ची आघाडी मिळवून दिली. 34 व्या मिनिटाला सेंटजॉनच्या आकांक्षाने गोल करुन 1-2 अशी आघाडी कमी केली. शेवटी हा सामना ताराराणीने जिंकला. सामन्यानंतर एसकेई सोसायटीचे क्रीडा विभागाचे चेअरमन आनंद सराफ, जीएसएस महाविद्यालयाचे प्राचार्य अरविंद हलगेकर, बेळगाव जिल्हा हॉकी संघटनेचे अध्यक्ष धनंजय पटेल, साजीद शेख, अकिब बेपारी, एन. बी. नदाफ, खलीक बेपारी, जे. ए. जाहगीरदार, गोपाळ खांडे, एम. जी. तेरणीकर, इब्राहीम शेख, इक्बाल बाँबेवाले, उत्तम शिंदे, इरफान बागेवाडी आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या एम. आर. भंडारी व ताराराणी-खानापूर तर उपविजेत्या भंडारी ब व सेंटजॉन काकती संघांना चषक व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. वैयक्तिक- प्रवीण जुट्टपन्नावर व मयुरी कंग्राळकर यांनी उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी बीडीएचएच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम केले.