भाग्यविधाता वारंग यांची बोर्ड परीक्षा समुपदेशनासाठी निवड
कुडाळ- प्रतिनिधी
जून -जुलै २०२५ मध्ये होणाऱ्या उच्च माध्यमिक व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या कालावधीत विद्यार्थी पालकांना मोफत समुपदेशन करण्यासाठी कुडाळ तालुक्यातील नर्मदाबाई अनंत शिवाजी देसाई विद्यालयाचे समुपदेशक भाग्यविधाता भास्कर वारंग यांची विभागीय मंडळ स्तरावर समुपदेशक म्हणून कोकण बोर्डाकडून नियुक्ती करण्यात आली आहे.उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा दि.२४ जून ते १६ जुलै व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा २४ जून ते ८ जुलै २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. सदर परीक्षेतील विद्यार्थी त्यांचे पालक यांच्यामध्ये परीक्षा संदर्भाने ताणतणाव, दडपण निर्माण झाल्यास तणावमुक्त होण्याच्या दृष्टीने व त्यांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी त्यांचे शंका निरसन होणे आवश्यक आहे. याकरिता विभागीय मंडळस्तरावर विद्यार्थी व पालकांसाठी मोफत समुपदेशनाची सुविधा पुरविण्यात येते. समुपदेशनाचा कालावधी परीक्षा संपेपर्यंत राहणार असून कोणत्याही वेळी दूरध्वनी- भ्रमणध्वनीवरून विद्यार्थी पालकांना ९४२३२१३२४० या क्रमांकावर ही समुपदेशन सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे, असे कोकण विभागीय मंडळ रत्नागिरीचे सचिव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.