‘मांजर’ चित्रपटात भाग्यश्री लिमये
चार मित्रांच्या नात्याभवती फिरणाऱ्या हिरेजडित ‘मांजर’चं रहस्य उलगडणार
मांजर आणि श्वान यासारखे पाळीव प्राणी माणसाच्या आयुष्याचा केवळ एक भाग नसतात, तर ते घरातील वातावरण आणि माणसांच्या वागण्या-बोलण्यावरही सकारात्मक परिणाम घडवतात. भारतीय चित्रपटसृष्टीत प्राणी अनेकदा कथानकातील महत्त्वाचे पात्र ठरले आहेत. या पार्श्वभूमीवर ‘मांजर’ हे शीर्षकही चित्रपटाच्या कथेत खास गुपित दडलेले असल्याची उत्सुकता निर्माण करते.
‘मांजर’ या चित्रपटाचे पोस्टर सादर करण्यात आले असून यात तीन मित्र, त्यांचे बेफिकिर जगणं, घरभर पसरलेला पसारा आणि या सगळ्याच्या मध्यभागी अचानक दिसणारी एक मैत्रिण, या भन्नाट चित्रामुळे आगामी मराठी चित्रपट ‘मांजर’च्या पोस्टरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढविली आहे.
तीन मित्रांच्या निवांत आयुष्यात भाग्यश्री लिमयेची एंट्री कोणता ट्विस्ट घेऊन येते हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मांजर चित्रपटाची निर्मिती एचथ्रीओ मोशन पिक्चर्स आणि जस्ट राइड फिल्म्सकडून करण्यात आली आहे. याचे दिग्दर्शन सुशील महादेव यांनी सांभाळली आहे. सिद्धार्थ मेनन, ओंकार भोजने, तेजस राऊत आणि भाग्यश्री यात प्रमुख भूमिकेत आहे. तर सयाजी शिंदे, अंशुमन विचारे, वैष्णवी अंधाडे आणि अश्विनी काळसेकर देखील यात दिसून येणार आहे.
पोस्टरमध्ये कपडे, मोबाइल, लॅपटॉप, इअरफोन्स बॅग्ज अशा वस्तूंनी भरलेले घर आणि त्यात अक्षरश: बिनधास्त वावरणारे तीन मित्र दिसात, त्यांच्या या मस्तमौला जगात भाग्यश्रीचं पात्र नेमकं काय घेऊन येते याची उत्सुकता पोस्टरमुळे अधिकच वाढली आहे. मांजर हा चित्रपट 18 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.