भाग्यनगर नववा क्रॉस रस्त्यांची दैना
महानगरपालिका लक्ष देणार का?
बेळगाव : बेळगाव शहराचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश झाला. स्मार्ट सिटी अंतर्गत कामे करण्यात आली. मात्र येथील समस्या संपणे अवघड झाले आहे. भाग्यनगर नववा क्रॉस अनगोळ येथे चिखलाचे साम्राज्य पसरले असून रस्ता पूर्णपणे चिखलमय झाला आहे. त्या रस्त्यावरून वाहने चालविणेच काय चालत जाणेदेखील अवघड झाले आहे. याकडे महानगरपालिका लक्ष देणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. भाग्यनगरमध्ये नेहमीच विविध समस्या निर्माण होत आहेत. त्याकडे महानगरपालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. यापूर्वी गटारी समस्येमुळे येथील नागरिक त्रस्त झाले होते. त्यानंतर आता रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या ठिकाणी खोदाई करण्यात आली असून त्याची माती रस्त्यावर टाकण्यात आली आहे. त्यामुळे सर्वत्र चिखल झाला आहे. या चिखलामधून वाहने घसरून अनेक जण पडून जखमी होत आहेत. पादचाऱ्यांनाही या रस्त्यावरून चालणे अवघड झाले. पाऊस पडल्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून तातडीने या रस्त्याची दुऊस्ती करावी, अशी मागणी या परिसरातील रहिवाशांतून होत आहे.