Vari Pandharichi 2025: साजिरे गोजिरे श्रीमुख चांगले। कर मिरविले कटावरी।, प्रेमाचा पुतळा विठोबा सावळा
ती केवळ शुद्ध भक्तीभावाने प्राप्त होते हे साऱ्या कुटुंबाने दाखवून दिले
By : मीरा उत्पात
ताशी : ज्ञानेश्वर माउलींनी स्थापन केलेल्या भागवत संप्रदाय सर्व जातीधर्मांना सामावून घेणारा होता. म्हणून कनिष्ठ जातीय चोखामेळ्याचे सारे कुटुंब या संप्रदायात सामील झाले. स्वत: चोखामेळा, पत्नी सोयरा, मुलगा कर्ममेळा, बहीण निर्मळा, मेहुणा बंका असे सारे समाजाचे चटके सहन करत भक्तीत रमून गेले.
जातीवर भगवंताची प्राप्ती अवलंबून नाही. ती केवळ शुद्ध भक्तीभावाने प्राप्त होते हे साऱ्या कुटुंबाने दाखवून दिले. या कुटुंबातील बंका हा विठ्ठलाचा निस्मीम भक्त होता. नामदेवाचा शिष्य चोखामेळा, चोखामेळ्याचा शिष्य बंका अशी गुरूपरंपरा आहे. समकालीन संतांनी बंकाचा गौरव केला आहे.
त्याचे अभंग चित्रात्मक शैलीत लिहिलेले आहेत. चोखोबाची पत्नी सोयराबाईला खूप वर्षे अपत्य नव्हते. तिला विठ्ठलाच्या कृपाप्रसादाने मुलगा झाला. या संपूर्ण प्रसंगाचे वेधक वर्णन बंकाने आपल्या अभंगातून केले आहे. वाचताना ही संपूर्ण काव्यकथा आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. त्याने आपल्या अभंगातून आपण पतित आहोत, याचे दु:ख व्यक्त केले आहे.
हीन याती पतित अपराधी दुर्बळ। परी तुम्ही दयाळ दीनानाथा।
असे म्हणत आपल्या मनातील व्यथा तो सांगतो. खरे तर विठ्ठलाची भक्ती करण्याचा सर्वांना समान अधिकार होता. परंतु, तत्कालीन समाजाने त्यांना जातिभेदाचे चटके दिले. पण हे सारे सहन करत बंकाने निरतिशय विठ्ठल भक्ती करत आत्मोन्नती केली. त्याने अभंगातून विठ्ठलाचे अतिशय सुंदर, रेखीव व्यक्तिचित्र उभे केले आहे. तो विठ्ठलाला प्रेमाचा पुतळा विठोबा सावळा, असे म्हणतो.
साजिरे गोजिरे श्रीमुख चांगले। कर मिरविले कटावरी। समचरण दोन्ही शोभती पाऊले। ध्यान मिरवले पंढरी राय।। असे विठ्ठलाचे वर्णन केले आहे. विठ्ठल हे बंकाचे सर्वस्व आहे. तू माझा मायबाप सकळ वित्त गोत। तू माझे गणगोत पंढरीराया। तू माझी माउली तू माझी माउली। प्रेमाची सावली तुचि माझी।।
असे विठ्ठलाला आर्ततेनं म्हणतो. तसेच आपल्या अभंगातून भक्तकल्पद्रुम देवाने भक्तांचे कसलेही काम आवडीने केले आहे हे सांगताना चोखोबाची मेलेली गुरे ओढली आहेत. सेना न्हाव्यासाठी बादशहाची हजामत केली आहे. नामदेवाचा हट्ट पुरवण्यासाठी त्याच्या हातून दूध प्यायले. जनाबाईचे दळण दळले.
गोरा कुंभाराचा चिखल तुडवला. ज्ञानेशाची भिंत चालवली, असा विठ्ठलाचा आणि संतांचा गौरव केला आहे. आपले गुरू चोखामेळा यांची थोरवी गाताना बंका म्हणतो चोखा चोखट निर्मळ। तया अंगी नाही मळ। अशा पवित्र, निर्मळ चोखोबामुळे मला विठ्ठलभक्ती मिळाली आहे. आणि या अनुपम आनंदाची प्राप्ती झाली आहे.
चोखोबांच्या सान्निध्यातील वास्तव्यामुळे बंकाच्या व्यक्तिमत्त्वाला पारमार्थिक उंची लाभली होती. बंका आधी मेहूणपुऱ्यास रहात होता. चोखोबामुळे तो मंगळवेढ्यास आला. मंगळवेढ्यात गावकुसाचे काम करताना झालेल्या अपघातात चोखामेळ्याचा मृत्यू झाला. मग पत्नी निर्मळेसह तो परत मेहूणपुऱ्यास गेला. तिथे निर्मळा नदीच्या काठावर त्याची आणि निर्मळेची समाधी आहे. काया-वाचा-मने विठ्ठलाची निस्सीम भक्ती करणारा बंका अलौकिक आहे!