For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

सावंतवाडी नगरपालिकेचा 100 वर्षांची परंपरा असलेला भगवान महावीर दवाखाना पुन्हा रुग्णसेवेत; नगराध्यक्ष श्रद्धा सावंत-भोसले यांच्या प्रयत्नांना यश; कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती

01:03 PM Oct 16, 2026 IST | Tarun Bharat Portal
सावंतवाडी नगरपालिकेचा 100 वर्षांची परंपरा असलेला भगवान महावीर दवाखाना पुन्हा रुग्णसेवेत  नगराध्यक्ष श्रद्धा सावंत भोसले यांच्या प्रयत्नांना यश  कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती
Advertisement
सावंतवाडी, प्रतिनिधी : सावंतवाडी नगरपालिकेचा गेल्या 100 वर्षांपासून रुग्णसेवेची परंपरा जपणारा भगवान महावीर आयुर्वेदिक व टी.बी. दवाखाना पुन्हा एकदा रुग्णांच्या सेवेत दाखल झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून डॉक्टर उपलब्ध नसल्याने बंद अवस्थेत असलेल्या या दवाखान्यात 16 ऑक्टोबरपासून पूर्ववत बाह्यरुग्ण विभागाची (ओपीडी) सेवा सुरू करण्यात आली आहे. नगराध्यक्ष श्रद्धा सावंत-भोसले यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आल्याने शहरातील सर्वसामान्य आणि गोरगरीब रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या दवाखान्यात डॉक्टर नसल्यामुळे रुग्णांना उपचारांसाठी इतर ठिकाणी जावे लागत होते. त्यामुळे दवाखान्यात कायमस्वरूपी डॉक्टर नियुक्त करून आरोग्यसेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी करण्यात येत होती. या समस्येकडे नगराध्यक्ष श्रद्धा सावंत-भोसले यांनी पालकमंत्री नितेश राणे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि आमदार दीपक केसरकर यांचे लक्ष वेधले होते. त्यांच्या पाठपुराव्यानंतर जिल्हा आरोग्य विभागाने या दवाखान्यात कायमस्वरूपी शहरी आरोग्यवर्धिनी केंद्राचे डॉक्टर नियुक्त केले आहेत.

Advertisement

या नियुक्तीमुळे दवाखान्यातील वैद्यकीय सेवा पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला. अनेक वर्षांपासून सावंतवाडी शहर आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाचा आधार ठरलेल्या या दवाखान्याची रुग्णसेवा आता पूर्ववत सुरू झाली आहे.

वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे स्वागत

दवाखान्यात ओपीडी सेवा सुरू झाल्यानिमित्त नगराध्यक्ष श्रद्धा सावंत-भोसले यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल चव्हाण तसेच स्टाफ नर्स करुणा करमळकर, कल्पना संगम आणि अन्य कर्मचाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. दवाखान्यात नियमित आरोग्यसेवा उपलब्ध झाल्याने नागरिकांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

Advertisement

गोरगरीब रुग्णांना मोठा दिलासा

यावेळी बोलताना नगराध्यक्ष श्रद्धा सावंत-भोसले म्हणाल्या, “सावंतवाडी शहर आणि आजूबाजूच्या परिसरातील सर्वसामान्य व गोरगरीब जनतेच्या हक्काचा हा दवाखाना आहे. गेल्या 100 वर्षांची रुग्णसेवेची परंपरा असलेला दवाखाना बंद राहणे हे शहरासाठी भूषणावह नव्हते. आता तो पुन्हा पूर्ववत सुरू झाल्याने गोरगरीब रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने सावंतवाडी नगरपालिका नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नेहमीच कार्यरत राहील.”

आरोग्य सभापतींचेही विशेष प्रयत्न

भगवान महावीर आयुर्वेदिक व टी.बी. दवाखाना पुन्हा सुरू व्हावा, यासाठी आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर यांनीही विशेष प्रयत्न केले. दवाखान्यात डॉक्टरांची नियुक्ती व्हावी आणि नागरिकांना स्थानिक पातळीवर आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे.

या वेळी नियोजन सभापती आनंद नेवगी, नगरसेविका दिपाली भालेकर, प्रतीक बांदेकर, सुकन्या टोपले, दुलारी रांगणेकर, शर्वरी धारगळकर, स्नेहा नाईक, पाणीपुरवठा विभागाच्या अधिकारी श्रीमती कांबळे, आशा वर्कर शिरोडकर आदी उपस्थित होते.

शंभर वर्षांची आरोग्यसेवेची परंपरा जपणारा हा दवाखाना पुन्हा सुरू झाल्याने सावंतवाडीतील नागरिकांना स्थानिक पातळीवर उपचार मिळण्यास मदत होणार आहे. नियमित ओपीडी सेवा सुरू राहिल्याने सर्वसामान्य रुग्णांसाठी ही सुविधा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

Advertisement
Tags :

.