श्रीमान भागोजीशेठ कीर, संत श्रेष्ठ श्री गाडगेबाबा यांची पूर्णाकृती पुतळे उभारणार! उदय सामंत यांची माहिती
स्वातंत्र्यदिनी करणार लोकार्पण
रत्नागिरी पतिनिधी
महाराष्ट्राचे भूषण असलेल्या दानशूर श्रीमान भागोजीशेठ कीर आणि त्यांचे गुरु संतश्रेष्ठ श्री गाडगेबाबा या महान विभूतींचे त्यांच्या लौकिकाला शोभेल अशा पद्धतीने पूर्णाकृती पुतळे रत्नागिरी शहरात उभारण्यात येतील आणि या पुतळ्यांचे येत्या स्वातंत्र्यदिनी लोकार्पण करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी आणि रायगड जिह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी रत्नागिरी दौऱ्यात दिली.
दानशूर भागोजीशेठ कीर यांचा पूर्णाकृती पुतळा रत्नागिरी शहराच्या प्रवेशद्वारी साळवी स्टॉप येथे तर संतश्रेष्ठ श्री गाडगेबाबा यांचा पुतळा जयस्तंभ येथील हुतात्मा अनंत कान्हेरे उद्यानात उभारण्यात येईल, असे सामंत यांनी सांगितले. ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ लिमये यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी तालुका भंडारी समाजाचे अध्यक्ष राजीव किर, रत्नागिरी जिल्हा परीट समाजाचे ज्येष्ठ सल्लागार प्रभाकर कासेकर, समाजभूषण सुरेंद्र घुडे, रत्नागिरी तालुका भंडारी समाजाचे उपाध्यक्ष कांचन मालगुंडकर यांनी मंत्री महोदयांशी चर्चा केली व या स्मारक उभारणीच्या कामी सर्वतोपरी सहकार्य देण्याचे आश्वासन दिले. हे पुतळे उभारण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी प्रथमपासूनच सकारात्मक भूमिका घेतली आहे.