या ‘ट्रेंड’ पासून सावधान
हे युग सोशल मिडियाचे आहे. सोशल मिडियावर अनेक ट्रेंडस् नेहमी येत-जात राहतात. युवापिढी लगेच त्या ट्रेंडस्च्या प्रेमात पडते आणि मागचा पुढचा किंवा साधकबाधाक विचार न करता त्या ट्रेंडस्च्या मागे धावते. यांपैकी बहुतेक ट्रेंडस् पुढे घातक परिणामांमध्ये परिवर्तीत होतात. नंतर त्यांना जाग येते. पण बऱ्याचदा जाग येईपर्यंत वेळ निघून गेलेली असते आणि हानी व्हायची ती झालेलीच असते. ही ट्रेंडस् युवापिढीला हेतुपुरस्सर बहकविण्यासाठी किंवा एखाद्या देशाची हानी व्हावी म्हणून देशाच्या हितशत्रूंनी मुद्दामच पसरविलेले असतात. सध्या असाच एक ट्रेंड लोकप्रिय होत आहे. जाणून बुजून उन्हात बराच वेळ उभे राहणे हा तो ट्रेंड आहे. वास्तविक सार्वसामान्य माणसे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी धडपडत असतात. त्यासाठी छत्री, टोपी किंवा सनस्क्रीनचा उपयोग केला जातो. तथापि, या ट्रेंडच्या आहारी गेलेले लोक, विशेषत: तरुण पिढीतील लोक अंगावरचे कपडे काढून तासनतास कडक उन्हात उभे किंवा पडून राहतात, असे दिसून आले आहे.
हा ट्रेंड भारतात फारसा दिसत नाही. तथापि, अनेक युरोपियन देशांमध्ये तो आहे. तेथील बहुतेक सर्व लोक गोऱ्या कातडीचे असतात. पण त्यांना आपली त्वचा तपकीरी किंवा ब्राऊन रंगाची करायची असते. कडक उन्हात अनेक तास उघड्या अंगाने घालवले तर त्वचेचा रंग बदलतो. वास्तविक हा प्रकार बऱ्याच पूर्वीपासूनचा आहे. तथापि, सोशल मिडियावर तो नव्याने प्रसारित होत आहे. त्याला ‘टॅनमॅक्सिंग’ असे नाव आहे. अनेक तरुण या ट्रेंडने भारलेले दिसून येतात. मात्र, त्वचा तपकीरी करण्याच्या या वेडापोटी आपण मोठ्या धोक्याला निमंत्रण देत आहोत, याची तमा अनेकजण बाळगत नाहीत. त्वचातज्ञांच्या म्हणण्यानुसार कडक उन्हात गोरी त्वचा तपकीरी होते, हे खरे असले तरी हा रंगबदल त्वचेची हानी करणाऱ्या एका रासायनिक पदार्थाचे प्रमाण त्वचेत वाढल्याने होत असतो. दिवसेंदिवस खूप वेळ उन्हात उघडे राहिल्याने त्वचा सुकते. ती अकाली ‘वृद्ध’ दिसू लागते. या कृतीमुळे त्वचेचे गंभीर विकार होण्याची शक्यता असते. त्यामुळे उन्हात थांबायचेच असेल, तर सनस्क्रीन उपयोगात आणावा, असा तज्ञांचा सल्ला आहे.