एन्फ्लुएन्झासारख्या श्वसनाच्या आजारापासून काळजी घ्या
आरोग्य-कुटुंब कल्याण विभागाच्या सूचना : लहान मुलांवर वाढता प्रभाव
बेळगाव : चीनमध्ये मुलांमध्ये श्वसनाचे आजार वाढल्याच्या बातम्या सध्या सर्वत्र येत आहेत. एन्फ्लुएन्झा व मायक्रोप्लाझमा यासारख्या आजारांमुळे मुलांमध्ये श्वसनाचे विकार वाढत आहेत. न्युमोनियासारख्या आजारांमुळे श्वसनाचे विकार वाढत नसल्याचे समोर आले आहे. बाधित व्यक्तीच्या खोकल्याने किंवा शिंकल्याने हा विषाणू दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचतो. पाच ते सात दिवस या आजाराचा प्रभाव राहू शकतो. प्रभाव अधिक असेल तर मृत्यूदेखील होण्याची शक्यता असते. विशेषत: अर्भक, गर्भवती महिला, रोगप्रतिकार शक्ती कमी असलेली व्यक्ती यांना या आजाराची जोखीम जास्त असते. ताप, थंडी वाजणे, अस्वस्थता, भूक न लागणे, मळमळणे, शिंका येणे, कोरडा खोकला ही या आजाराची सामान्य लक्षणे आहेत. एन्फ्लुएन्झा व इतर श्वसनाविषयीचे आजार नियंत्रणात ठेवण्यासाठी खालील खबरदारी घेणे गरजेचे आहे.
- खोकताना किंवा शिंकताना नाक व तोंडावर रुमाल किंवा टिश्यू पेपर धरावा
- आपले हात वारंवार साबणाने आणि पाण्याने धुवावेत
- डोळे, नाक किंवा तोंड यांना विनाकारण स्पर्श टाळावा
- गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, गेल्यास फेसमास्कचा वापर करावा
- आजारी व्यक्तीपासून सुरक्षित अंतर ठेवावे
- पुरेशी झोप व सकस आहार, भरपूर पाणी प्यावे
- सार्वजनिक ठिकाणी थुंकणे टाळावे
एन्फ्लुएन्झाची लक्षणे दिसून आल्यास...
- एन्फ्लुएन्झाची लक्षणे दिसून आल्यास संबंधित व्यक्तीला जवळच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करावे
- लक्षणे आढळल्यास सात दिवसांपर्यंत इतरांशी संपर्क टाळावा
- डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधांचा वापर करू नये
असे आवाहन आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्यावतीने नागरिकांना करण्यात आले आहे.