For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सावधान! शहराला डेंग्यू-काविळीचा विळखा

11:57 AM Jun 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
सावधान  शहराला डेंग्यू काविळीचा विळखा
Advertisement

आरोग्य खात्याच्या माहितीनुसार सध्या डेंग्यूच्या 137 रुग्णांची नोंद : रुग्णांमध्ये तरुणांचे प्रमाण अधिक

Advertisement

बेळगाव : शहराला डेंग्यू आणि काविळीच्या रोगाने विळखा घातला आहे.दररोज या दोन्ही रोगांचे रुग्ण वाढत असून यामध्ये तरुणांचे प्रमाण अधिक आहे. काही दिवसांपूर्वी ‘तरुण भारत’ने काविळीसंदर्भात डॉक्टरांच्या म्हणण्यासह वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यावेळी बाकी काही उपाय शक्य नसले तरी किमान पाणी उकळून प्या, असा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. आरोग्य खात्याच्या माहितीनुसार सध्या डेंग्यूचे 137 रुग्ण नोंद झाले आहेत. एलिझा चाचणी केल्यानंतर ही आकडेवारी पुढे आली आहे. परंतु, खासगी रुग्णालयांमध्ये या दोन्ही रोगांचे रुग्ण वाढले आहेत, हे वास्तव आहे.

तथापि, याबाबत आरोग्य खाते आणि महानगरपालिकेने पुरेशी जनजागृती केली नाही. लोकांनीसुद्धा ही बाब गांभीर्याने घेतली नाही. तरुणाईने बाहेरील पदार्थ आणि प्रामुख्याने पाणी सेवन करण्याचे थांबवले नाही. याचीच परिणीती डेंग्यू आणि कावीळ वाढण्यामध्ये झाली आहे. डेंग्यू हा ठरावीक प्रजातीच्या डासांमुळे होतो आणि हे डास स्वच्छ पाण्यावर बसतात. परंतु, कावीळ मात्र दूषित पाणी पिल्यामुळेच होते. त्यामुळे सध्या पाणी उकळून पिणे हा अत्यंत साधा आणि त्वरित करण्याजोगा उपाय आहे.

Advertisement

सध्या वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये कावीळ व डेंग्युमुळे दाखल झालेल्या रुग्णांमध्ये तरुणांचे प्रमाण अधिक आहे. त्यातही ठरावीक महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक असून त्या-त्या शैक्षणिक संस्थांच्या चालकांनी काळजी घेणे आवश्यक बनले आहे. उन्हाळ्यामध्ये विहिरींचे पाणी तळाला जाते. ते बऱ्याचदा दूषित होते. तळाचे पाणी पिल्यानेसुद्धा रोग उद्भवतात. तसेच बऱ्याच ठिकाणी विहिरींच्या पाण्यात ड्रेनेजचे पाणी मिसळले आहे. त्याचाही फटका बसला आहे.

डेंग्यू-काविळीबाबत सातत्याने जागरुकता आवश्यक

कावीळ व डेंग्यूवर उपचार करणाऱ्या तज्ञ डॉक्टरांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पाणी उकळून पिण्याबाबत आवाहन करण्याची विनंती केली होती. महानगरपालिकेने याबाबत एखाद दुसरे पत्रक प्रसिद्धीस दिले. तथापि, डॉक्टरांच्या मते ही खऱ्याअर्थाने जनजागृती नाही. ज्याप्रमाणे कचरा संकलनासाठी येणारी गाडी ठरावीक गाणे वाजवून ध्वनीक्षेपकावरून जागरूक करते, त्याचप्रमाणे डेंग्यू आणि काविळीबाबत सातत्याने जागरुकता करणारी गाडी फिरणे आवश्यक आहे.

त्याचबरोबर तरुणाईमध्ये या दोन्ही रोगांचे प्रमाण वाढले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्या शरीरामध्ये अँटीबॉडीज (प्रतिजैवके) अपेक्षेइतकी तयार होत नाहीत. यामध्ये त्यांच्या खाण्याच्या पद्धती, जंक फूड याचबरोबर दूषित पाणी हे कारण आहे. वारंवार सांगूनही तरुणाईने ही बाब गांभीर्याने घेतली नाही. सध्या शहराला या दोन्ही रोगांनी विळखा घातला आहे. आता महानगरपालिकेने फॉगिंग सुरू केले आहे. परंतु, तो केवळ वरवरचा उपाय झाला.

मुळात दूषित विहिरींची स्वच्छता युद्धपातळीवर हाती घेण्याची गरज आहे. कोठेही कचरा साचून राहणार नाही, याची खबरदारी घेतली जाईल तो सुदिन म्हणावा लागेल. बाहेर उघड्यावर मिळणाऱ्या खाद्यपदार्थांचा दर्जा आणि प्रामुख्याने पाणी तपासणे आवश्यक आहे. सध्या जोपर्यंत या रोगांचा विळखा वाढत आहे, तोपर्यंत तरी बाहेरील खाद्यपदार्थ हे बाधक ठरणार नाहीत, याची काळजी उत्पादकांबरोबरच महानगरपालिका व अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांनी घेण्याची गरज आहे. पोटविकार तज्ञांच्या मते काविळीवरती ठरावीक औषध घेताना दुसऱ्या पॅथीचे औषध घेणे घातक ठरू शकते. दोन्ही पॅथी अवलंबल्यामुळे रुग्ण कोमात जाण्याच्या घटनाही घडल्या असून अशा रुग्णांची सध्या आयसीयुमध्ये रवानगी करण्यात आली आहे. तरुणाईच्या भवितव्याचा विचार करता ज्या परिसरात ही रुग्णसंख्या वाढते आहे, तेथे सरसकट लसीकरण मोहीम राबवावी, असा सल्लाही तज्ञांनी दिला आहे.

गतवर्षीच्या तुलनेमध्ये प्रमाण 15 टक्क्यांनी वाढले

याबाबत जिल्हा आरोग्याधिकारी डॉ.महेश कोनी यांच्याशी संपर्क साधता त्यांनी डेंग्यू रोखण्यासाठी सर्व ते उपाय करत आहोत. एलिझा टेस्ट केल्यानंतर एकूण 137 जणांना डेंग्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गतवर्षीच्या तुलनेमध्ये हे प्रमाण अधिक असून ते 15 टक्क्यांनी वाढले आहे, असे सांगितले.

जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. महेश कोनी 

युद्धपातळीवर स्वच्छता, फवारणीचे काम

महानगरपालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. संजीव नांद्रे यांनी महानगरपालिकेने सर्वत्र फवारणी मोहीम हाती घेतली आहे. ज्या भागामध्ये रुग्ण अधिक आहेत, तेथे युद्धपातळीवर स्वच्छता आणि फवारणीचे काम सुरू आहे. तथापि, काविळीचे रुग्ण ठरावीक ठिकाणी असे नसून वेगवेगळ्या भागात आहेत. एकाच भागात जर दोन किंवा तीनपेक्षा अधिक रुग्ण आढळले तर ‘आऊटब्रेकिंग’ असे समजले जाते. परंतु, सध्या तरी तशी परिस्थिती उद्भवलेली नाही, असे सांगितले.

डॉ. संजीव नांद्रे

Advertisement
Tags :

.