For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

क्रिकेटवर बेटिंग...पोलिसांची बॅटिंग

06:35 AM May 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
क्रिकेटवर बेटिंग   पोलिसांची बॅटिंग
Advertisement

मलिदा लाटण्यासाठी अधिकारी सरसावले

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

आयपीएल क्रिकेट सामन्यावर बेळगावात बेटिंग वाढले आहे. रविवारी चेन्नई येथे केकेआर-हैदराबाद यांच्यात होणाऱ्या अंतिम सामन्यावर मोठ्या प्रमाणात बेटिंग सुरू झाले आहे. एकीकडे चोऱ्या, घरफोड्या, दगडफेक आदी प्रकार घडत असताना त्यावर आळा घालण्याची जबाबदारी असणारे अनेक पोलीस अधिकारी मात्र बेटिंग बहाद्दरांकडून हप्ते वसुली करत आहेत. रविवारी अंतिम सामना आहे. त्यामुळे बेटिंग घेणाऱ्यांना शोधून अनेक अधिकारी त्यांच्याकडे मोठी रक्कम मागत आहेत. यासाठी काही पोलीस कर्मचाऱ्यांना कामाला लावण्यात आले असून बुकिंना शोधून ते साहेबांचे निरोप देत आहेत. ‘तुझे गैरधंदे खूप वाढले आहेत. त्यामुळे तू साहेबांना मलिदा पोहोचव’ असा निरोप दिला जात आहे. ऑनलाईन अॅपवर बेटिंग सुरू आहेच. याबरोबरच बुकीही कामाला लागले आहेत. रविवारी अंतिम सामन्यावर मोठ्या प्रमाणात बेटिंगमध्ये उलाढाल होणार आहे. त्यामुळेच या परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी काही अधिकाऱ्यांनी आपली यंत्रणा कामाला लावली आहे. ‘आमचे ऐका नाही तर दोन दिवस गाव सोडा’ असे निरोप दिले जात आहेत. बेळगावात गुन्हेगारी वाढली आहे. अनेक प्रकरणांचे तपास पुढे सरकत नाहीत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगावात आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना याचे कसलेच गांभीर्य नाही. निवडणूक निकालानंतर आम्ही कसेही जाणार आहोत, तेव्हा नसती कटकट कशाला? या मनस्थितीत ते आहेत. जाता जाता जे मिळेल ते ओरबाडण्यासाठी काही अधिकाऱ्यांनी यंत्रणा कामाला लावली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.