For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेथेलचे नाबाद शतक, इंग्लंड आघाडीवर

06:55 AM Jan 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
बेथेलचे नाबाद शतक  इंग्लंड आघाडीवर
Advertisement

 चौथ्या दिवशी इंग्लंडच्या 8 बाद 302 धावा, 119 धावांची आघाडी : कांगारुंच्या पहिल्या डावात 567 धावा

Advertisement

वृत्तसंस्था/ सिडनी

येथील सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळल्या जात असलेल्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटीच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या डावात 567 धावांवर सर्वबाद झाला. कांगारुंना पहिल्या डावाच्या आधारावर 183 धावांची आघाडी मिळाली. यानंतर जेकब बेथेलच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने दुसऱ्या डावात 8 बाद 302 धावा केल्या असून त्यांच्याकडे 119 धावांची आघाडी आहे. दिवसअखेरीस जेकब बेथेल 142 धावांवर नाबाद परतला. आज पाचव्या दिवशी इंग्लंड भलीमोठी आघाडी घेणार की कांगारु हा सामना जिंकणार याची उत्सुकता असणार आहे.

Advertisement

प्रारंभी, चौथ्या दिवसाचा खेळ सुरु झाल्यावर ऑस्ट्रेलियाचा स्कोर 7 बाद 518 असा होता. स्टीव्ह स्मिथ (129) आणि ब्यू वेबस्टर (42) यांनी डाव पुढे नेला. दरम्यान, यजमान संघाने धावसंख्येत 49 धावांची भर घातली आणि त्यांचा पहिला डाव 567 धावांवर आटोपला. त्यामुळे त्यांना 183 धावांची आघाडी मिळाली. ऑस्ट्रेलियासाठी कर्णधार स्टीव्ह स्मिथने 220 चेंडूंमध्ये 138 धावा केल्या, ज्यात 16 चौकार आणि एक षटकार समाविष्ट होता. वेबस्टरने 87 चेंडूंमध्ये 7 चौकारासह 71 धावांचे योगदान दिले. याशिवाय, ट्रॅव्हिस हेडने सर्वाधिक 163 धावा केल्या. इंग्लंडकडून कार्से आणि जोश टंग यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या.

बेथेलचे शतक, इंग्लंडकडे शतकी आघाडी

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 567 संपल्यानंतर इंग्लंडच्या दुसऱ्या डावाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर जॅक क्रॉली पहिल्याच षटकांत बाद झाला. त्याला केवळ एकच धावा करता आली. यानंतर बेन डकेट आणि जेकब बेथेल यांनी डाव सांभाळला आणि अर्धशतकी भागीदारी केली. डकेटने या मालिकेत पहिल्यांदाच 40 धावांचा टप्पा ओलांडला, पण नंतर तो लगेचच बाद झाला. त्याने 6 चौकारासह 42 धावा केल्या. पहिल्या डावात शतक झळकावणारा जो रुट दुसऱ्या डावात मात्र स्वस्तात बाद झाला. तो फक्त 6 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर हॅरी ब्रूक आणि बेथेल या दोघांनी शतकी भागीदारी केली. ही जोडी मैदानात असेपर्यंत इंग्लंडचा संघ दमदार स्थितीत वाटत होता. पण, अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असताना ब्रूक 42 धावा करुन बाद झाला आणि त्यांनतर लगेचच संघाची गळती सुरु झाली.

अनुभवी विल जॅक्सला भोपळाही फोडता आला नाही. कर्णधार बेन स्टोक्स पहिल्या डावाप्रमाणे या डावातही अपयशी ठरला. जेमी स्मिथने 3 चौकारासह 26 धावांचे योगदान दिले. एकीकडे खालच्या फळीतील फलंदाज बाद होत राहिले, पण 22 वर्षीय बेथेल मात्र एका बाजूला टिकून राहिला. त्याने कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावताना 232 चेंडूत 15 चौकारासह नाबाद 142 धावा फटकावल्या. बेथेलच्या या शानदार शतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने चौथ्या दिवशी 75 षटकांत 8 गडी गमावत 302 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाकडून वेबस्टरने सर्वाधिक 3 गडी बाद केले. स्कॉट बोलँडने 2 तर मिचेल स्टार्कने 1 गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक

इंग्लंड पहिला डाव 384 आणि दुसरा डाव 75 षटकांत 8 बाद 302 (बेथेल खेळत आहे 142, बेन डकेट 42, हॅरी ब्रूक 42, जेमी स्मिथ 26, कार्से 16, वेबस्टर 3 बळी, बोलँड 2 तर स्टार्क 1 बळी).

ऑस्ट्रेलिया पहिला डाव सर्वबाद 567 (ट्रॅव्हिस हेड 163, लाबुशेन 48, स्टीव्ह स्मिथ 138, कॅमरुन ग्रीन 37, वेबस्टर नाबाद 71, कार्से आणि जोश टंग प्रत्येकी 3 बळी, बेन स्टोक्स 2 बळी).

Advertisement
Tags :

.