मुख्यमंत्र्यांकडूनही गोमंतकीयांना शुभेच्छा
पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोमंतकीयांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. आपल्या संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, गणेश चतुर्थीला गोव्यात पारंपरिकपणे ‘चवथ’ म्हणून ओळखले जाते. एकता, शांतता आणि समृद्धीचे प्रतीक असलेला गणेशोत्सव आनंददायी आणि भरभराटीचा जावो, अशी मुख्यमंत्र्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात सणाचे महत्व प्रतिपादले. गणपती बाप्पा हे सर्वात लोकप्रिय दैवत असून गणेश मूर्तीच्या आगमनाने आपल्या घरांमध्ये नवीन आशा आणि आनंद घेऊन येतो. मुख्यमंत्र्यांनी स्वयंपूर्ण गोवा कार्यक्रमाद्वारे वोकल फॉर लोकलव्दारे प्रोत्साहन देण्यासाठी गोवा सरकारच्या पुढाकाराचा विशेष उल्लेख केला, ज्यामध्ये गोवा बाजार,फळार आणि माटोळीच्या वस्तूंसह पारंपरिक गोव्याची उत्पादने थेट ग्राहकांना उपलब्ध करून देणारे ऑनलाइन पोर्टल समाविष्ट आहे. त्यांनी स्थानिक शेतकरी आणि कारागीरांना सक्षम बनविण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेवर भर दिला आणि नागरिकांना ताज्या आणि हाताने बनवलेल्या उत्पादनांच्या सोयीस्कर प्रवेशाचा आनंद घेताना स्थानिक आर्थिक वाढीस समर्थन देत या व्यासपीठाचा वापर करण्यास प्रोत्साहित केले. शांतता आणि बंधुतेचा प्रसार करण्यासाठी लोकांनी हा सण भक्तिभावाने साजरा करावा आणि आध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले.