सर्वश्रेष्ठ कर्मयोगी
अध्याय नववा
बाप्पा म्हणाले, अनन्य भक्ताला आत्मसाक्षात्काराचाच अनुभव आला असल्याकारणामुळे तो देहातच विदेहपणाने वागत असतो. माझ्या स्वरूपाला पोचून जे देहाभिमानाला विसरतात, ते ज्ञानमय होऊन माझ्या आनंदरूप रसामध्ये निमग्न होतात. देहभावना विसरलेली असल्याने तो स्वत:ला विसरून गेलेला असतो. त्यामुळे त्याच्या लेखी मी सोडून इतर गोष्टी अस्तित्वातच नसतात. अगदी ब्रह्मा, विष्णु आणि महेश सगळे सगळे नाहीसे होऊन एक अविनाशी ब्रह्मच काय ते शिल्लक राहते. इतके सायुज्यस्वरूप प्राप्त होण्यासाठी माझी अनन्य भक्ती कर. कारण सर्व चराचर मीच व्यापून राहिलेलो आहे. ह्या अर्थाचा पुढील श्लोक आपण अभ्यासत आहोत.
अग्नौ सूर्ये तथा सोमे यच्च तारासु संस्थितम् ।
विदुषि ब्राह्मणे तेजो विद्धि तन्मामकं नृप ।। 36।। त्यानुसार अग्नि, सूर्य, चंद्र, तारे, विद्वान् ब्राह्मण यांचे ठिकाण जे तेज असते ते बाप्पांचे आहे. समस्त चराचर सृष्टी सर्वांना दिसावी यासाठी जो प्रकाश आवश्यक आहे तोही त्यांच्यापासूनच आलेला आहे. अग्नी, सूर्य, चंद्र, तारका व विद्वान ब्राह्मण यांना प्राप्त झालेल्या तेजावरून ईश्वराचे तेज किती दैदिप्यमान असेल याची आपण कल्पना करू शकतो. ही सृष्टी सर्वांना दिसण्यासाठी त्या तेजापैकी एखादा अंश पुरेसा आहे. विद्वान ब्राह्मणांच्या तेजाचा उल्लेख बाप्पांनी येथे सूर्य, चंद्र, अग्नी, तारका यांच्या तेजाच्या बरोबरीने केलेला आहे आणि पुढे सांगतात की, ब्राह्मणांच्यात असलेले तेज माझेच आहे. ब्राह्मणांचा विशेष उल्लेख करण्याचं कारण म्हणजे त्यांच्या विद्वत्तेमुळे अज्ञानरुप अंद्धकाराचा नाश होतो. सूर्यप्रकाशामुळे हे शक्य होत नाही. ब्राह्मणांच्या मंत्रसामर्थ्यामुळे प्रकट होणारे तेज हे ईश्वराचेच बोधमय तेज असते. त्यातून होणाऱ्या बोधातूनच ईश्वराच्या मूळ स्वरूपाचे ज्ञान होते. थोडक्यात असा निष्कर्ष निघतो की, सृष्टीत जी काही बलवत्ता, विशेषत:, विलक्षणता, शक्ती आणि तेज दिसून येते ते सर्व ईश्वरापासूनच आलेले आहे. पुढील श्लोकातून बाप्पा सृष्टीनिर्मिती, चालना व विसर्जन याबद्दल भाष्य करत आहेत.
अहमेवाखिलं विश्वं सृजामि विसृजामि च ।
औषधीस्तेजसा सर्वा विश्वं चाप्याययाम्यहम् ।। 37।।
अर्थ- सर्व विश्वाची मीच उत्पत्ती करतो व नाश करतो. सर्व औषधी व विश्व यांना तेजाने युक्त करतो.
सर्वेन्द्रियाण्यधिष्ठाय जाठरं च धनंजयम् ।
भुनज्मि चाखिलान्भोगान्पुण्यपाप विवर्जितऽ ।। 38 ।।
अर्थ- सर्व इंद्रियांचे ठिकाणी आणि जठरातील धनंजय अग्नीचे ठिकाणी राहून मी पुण्य व पाप यांनी रहित होऊन सर्व भोग भोगतो.
विवरण- बाप्पा म्हणतात ईश्वरात मुळातच वसत असलेल्या सृष्टीचे प्रकटीकरण करून तिचे पालन करतो आणि वेळ आली की, संहारही करतो हे सर्व सृष्टीचालन करण्यासाठी तो सर्व सजीव निर्जीव वस्तूत वास करत असतो व सर्व पदार्थांचा उपभोगही घेत असतो. प्रत्येक वस्तूची रचना कशी असावी, प्रत्येक प्राण्याच्या शरीराची रचना कशी असावी हे सर्व त्याने अत्यंत काळजीपूर्वक ठरवलं आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या अपेक्षित हालचालीनुरूप शरीररचना त्याने केलेली आहे.
ह्या रचना इतक्या परिपूर्ण आहेत की, त्यात सुधारणेला कुठेही वाव नाही किंवा या वस्तूत जीवनक्रम चालण्याच्या दृष्टीने अमुक एक कमी आहे असं कुणी म्हणू शकलेलं नाही. इतक्या सर्व गोष्टी कोणतीही अपेक्षा न ठेवता त्यांच्याकडून केल्या जातात. आईवडीलांच्या भूमिकेतून ईश्वर विश्वासाठी कार्य करत असतो परंतु हे सर्व तो संपूर्ण निरपेक्षतेनं करत असल्याने त्याला कोणत्याही पाप पुण्याची बाधा होत नाही म्हणून ईश्वराला सर्वश्रेष्ठ कर्मयोगी म्हणता येईल.
क्रमश: